आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पान विक्रेत्याची मुलगी बनली न्यायाधीश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कुटुंबाची अर्थिक स्थिती हलाकीची असल्यामुळे शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. प्राथमिक शिक्षणाची अबाळ तर झालीच, पण सोनाली पवार यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. सामाजिक न्यायाचा अर्थ शोधत शोधत आता त्या न्यायदंडाधिकारी बनल्या आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेला अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय देण्याची जबाबदारी त्या लीलया पेलतील, असा विश्वास कुटुंबाला आहे.

सोलापुरातील सोनाली पवार यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नुकतीच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे. सोनालीच्या शिक्षण आणि न्यायदंडाधिकारी पदापर्यंतची कहाणी रंजक आहे. सोनाली यांचे वडील तानाजी पवार हे जामश्री मिलचे कामगार होते. बेकारीची कुर्‍हाड कोसळल्यानंतर चरितार्थासाठी त्यांनी पांजरापोळ चौकात छोटेखानी पान टपरी सुरू केली.

मितभाषी असले तरी त्यांनी आपल्या हास्यवदनाने गिर्‍हाईकांचे स्वागत करून अनेकांना जोडले. याच व्यवसायाच्या कमाईतून चार अपत्ये लहानाची मोठी केली. कुटुंबात स्पर्धा परीक्षा म्हणजे काय कोणालाच माहीत नव्हते.

सोनालीचे पाच शाळेत प्राथमिक शिक्षण
सोनालीचे प्राथमिक शिक्षण सोलापूर महानगरपालिकेच्या 18 नंबर शाळेत, तिसरी मोहोळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत, चौथीपासून दमाणीनगरच्या सह्याद्रीत, सातवीपासून संभाजीराव शिंदे आणि महाविद्यालयीन दयानंद विधी महाविद्यालयात झाले. मोठा गणेश यांनीही एक तप पान दुकानात काम करीत शिक्षण पूर्ण केले. सोनाली अजूनही वडिलांना जेवणाचा डबा देणे, नेणे आणणे, भाजी आणणे, स्वयंपाक करणे अशी घरगुती कामे करून कुटुंबाला प्रत्येक कामात मदत करते.