आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात पहिल्यांदाच येणार्‍या चिरंजीवीची अफाट उत्सुकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवाची सांगता रविवारी (दि. 29) आयोजित केल्याची माहिती संस्था अध्यक्ष महेश कोठे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या समवेत तेलुगु चित्रपट अभिनेता आणि केंद्रीय पर्यटनमंत्री चिरंजीवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कुचन प्रशालेच्या पटांगणात सकाळी नऊला हा कार्यक्रम होईल.

मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते स्मृतिग्रंथाचे प्रकाशन तर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते ‘शतपद्म’ या स्मरणिकेचे प्रकाशन होईल. या वेळी महापौर अलका राठोड, राज्याचे दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, पालकमंत्री दिलीप सोपल, गुंटूरच्या आमदार कंद्रू कमलागारू, आमदार प्रणिती शिंदे, दिलीप माने, विजयकुमार देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 1912 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याचा शतक महोत्सव 2012 मध्येच झाला. सांगता समारंभासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या तारखा निश्चित होत नसल्याने विलंब झाल्याचे संस्थेचे सचिव दशरथ गोप म्हणाले. या वेळी उपाध्यक्ष नागनाथ गंजी, खजिनदार अरविंद कुचन, दिनेश यन्नम, पेंटप्पा गज्जम आदी उपस्थित होते.

कारमपुरी, दासरींचा अर्ज फेटाळला
शिक्षण संस्था हिताच्या विरोधात कारवाई केल्याचा ठपका ठेवून पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी आणि सरचिटणीस अजय दासरी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय शिक्षण संस्थेने घेतला. 30 डिसेंबर रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत हा विषय अजेंड्यावर घेतला. दोघांनाही सभेत म्हणणे देण्याची नोटीस बजावली. त्याला आव्हान देणारा अर्ज दोघांनीही दिवाणी न्यायालयात केला. न्यायाधीश ऋतुजा भोसले यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत, आजीव सदस्य असल्याने आमचे सदस्यत्व रद्द करता येत नाही, असा युक्तिवाद केला. तो अमान्य करत न्यायाधीश भोसले यांनी दोघांचा अर्ज मंगळवारी फेटाळून लावला. शिक्षण संस्थेच्या वतीने अँड. नितीन हबीब तर ज्ञाती संस्थेच्या वतीने अँड. एम. ए. शेख यांनी काम पाहिले. भवानी पेठेतील कोंडीवाडा पाडल्याचा राग शिक्षण संस्थेने असा काढला.

महामृत्युंजय यज्ञ उद्या
शताब्दी महोत्सवाच्या सांगतानिमित्त गुरुवारी (दि. 26) महामृत्युंजय महायज्ञ आयोजित केला आहे. त्यासाठी अक्कलकोटच्या शिवपुरीचे डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले येणार आहेत. मध्यवर्ती एक मोठे कुंड आणि त्याच्या भोवती 108 कुंड या वेळी प्रज्वलित करण्यात येणार आहेत. त्यातून सामुदायिक अग्निहोत्र म्हटले जाणार आहे. त्यानंतर पुरुषोत्तम महाराज यांचे प्रवचन, ध्यानसाधना आदी कार्यक्रम होतील. समाजबांधवांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.