आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर वर्षांची संस्था, एकोप्याने टिकवा; पर्यटनमंत्री चिरंजीवी यांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अनेक वर्षांपासून सोलापूरला येण्याची इच्छा होती. इथल्या चाहत्यांच्या टाळ्या, किंकाळ्या ऐकण्यासाठी आतूर होतो. परंतु अभिनेता म्हणून येण्याचे जमलेच नाही. राजकीय नेता म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. तुमचे प्रेम मी कधीच विसरणार नाही..’ हे बोल आहेत, केंद्रीय पर्यटनमंत्री आणि तेलुगु चित्रपटांतील अभिनेते डॉ. के. चिरंजीवी यांचे. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी सांगता सोहळ्यासाठी ते रविवारी सकाळी सोलापूरला आले होते. शंभर वर्षांची ही संस्था एकोप्याने टिकवून ठेवा, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.

कुचन प्रशालेच्या कोंडा क्रीडांगणावर हा सोहळा झाला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्‍जवला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, दिलीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांनी प्रास्ताविक केले.

काळजात अन् भिंतीवर
चिरंजीवी यांनी 1983 मधील एक आठवण सांगितली. ‘चंटी अब्बाई’ या चित्रपटात त्यांनी चार्ली चॅप्लीनची भूमिका केली होती. त्याची प्रतिमा हातमागावर विणून सोलापूरच्या चाहत्यांनी चिरंजीवींना भेट म्हणून दिली. ‘ही भेट माझ्या घरातल्या भिंतीवर अजूनही आहे. तुमचे हे प्रेम माझ्या काळजात कोरून ठेवलं आहे.’

तीर्थक्षेत्रांसाठी 43 कोटी
सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांचा मेगा सर्किट करण्याविषयी शिंदे यांनी सुचवले. 43 कोटी रुपये दिले. माझ्या कामासाठीही शिंदे अशीच तत्परता दाखवतात. परदेशी पर्यटकांना देशाचा व्हीसा देण्याबाबत गृहमंत्रालयातील कामांना ते विलंब करत नाहीत. त्यामुळे तर परदेशी पर्यटकांची संख्या वाढली, असे चिरंजीवींनी सांगितले.

चिरंजीवी म्हणतात..
- सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘स्माइलिंग फेस’चा मी चाहता.
- प्रणिती शिंदे माझ्या भगिनी वाटतात.
- पद्मशाली समाजासाठी शिंदे यांनी बरेच दिले, अजूनही देतील.
- कुठली समस्या असेल तर सांगा. सोलापूरला धावत येईन.

50 वर्षांपूर्वी ते, आता नवे
शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवाची आठवण श्री. शिंदे यांनी सांगितली. त्या वेळी माजी खासदार गंगाधरपंत कुचन, माजी मंत्री (कै.) रामकृष्णपंत बेत, माजी आमदार (कै.) व्यंकप्पा मडूर, माजी महापौर (कै.) इरप्पा बोल्ली होते. आता संस्थेची सूत्रे नव्यांच्या हाती आहेत, असेही ते म्हणाले.

बहिष्कार कायम
ज्ञाती संस्थेने बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पूर्वभागातल्या नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली नाही. महोत्सवाच्या प्रारंभाला उपस्थित असणारे माजी खासदार गंगाधरपंत कुचन, धर्मण्णा सादूल, माजी आमदार नरसय्या आडम, माजी महापौर डॉ. पुरणचंद्र पुंजाल यांच्यासह ज्ञातीचे पदाधिकारी नव्हते.