आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मशाली संस्था: शतक महोत्सवाची सांगता होणार कधी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पद्मशाली शिक्षण संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष संपून सहा महिने झाले तरी त्याची सांगता झालेली नाही. वाजत-गाजत महोत्सवाला सुरुवात झाली. सांगता समारंभाला राष्ट्रपतींना आणण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले होते. डिसेंबर 2012 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सोलापूर दौरा झाला. परंतु, त्यांच्या कार्यक्रमांच्या यादीत शिक्षण संस्थेचे नाव नव्हते. त्यानंतर अजूनही सांगता कार्यक्रम लांबतच आहे.

तेलंगणातून सोलापुरात आलेला पद्मशाली समाजाचा समूह शहराच्या पूर्वभागात एकवटला होता. हातमागांवर वस्त्रे विणून उपजीविका करत होता. महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहायचे असेल तर मराठीतून शिक्षण घेतलेच पाहिजे, या उद्देशाने काही अध्वयरूंनी 1912 मध्ये पद्मशाली शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वत:ची घरे संस्थेसाठी दिली. त्यातून ही संस्था वाढीस लागली. आज संस्थेच्या 20 शाखा कार्यरत आहेत. 15000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 2012 मध्ये संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली. तेलुगु भाषकांनी सुरू केलेल्या या मराठी ज्ञानमंदिराच्या शतक महोत्सवासाठी सारा समाज एक झाला होता. डिसेंबर 2012 मध्ये त्याची सांगता अपेक्षित होती; परंतु नेते मिळत नसल्याने हा सोहळा होत नसल्याचे संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी सांगितले. मुख्यमंत्री अथवा इतर नेते आणायचे कारण म्हणजे संस्थेच्या वाढीसाठी निधीची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नेत्यांनी एक व्हावे!
पूर्वभागातील नेतेमंडळी एक होत नाहीत. आज कुठलाच मोठा नेता पद्मशाली समाजाशी बांधील नाही. परिणामी समाजाचा र्‍हास सुरूच आहे. शिक्षण संस्थेच्या सांगता समारोपासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. संस्थेच्या विकासासाठी किमान पाच कोटी देणारा कोणी नेता भेटला तर सांगता करून टाकू.’’ दशरथ गोप, सचिव, पद्मशाली शिक्षण संस्था

निधी मिळवून दिला असता
शिक्षण संस्थेचे पदाधिकारी समाजाला विश्वासात घेऊन चर्चा केली असती तर मी कृषिमंत्री शरद पवार यांना आणले असते. त्यांच्याकडून निधीही मिळवून दिला असता. नुकत्याच जन्माला आलेल्या मौलाना आझाद तंत्रनिकेतनला पवारांनी 75 लाखांची देणगी जाहीर केली. शंभरी गाठलेल्या संस्थेला किती मिळाले असते? परंतु, संस्थेचे पदाधिकारी समाजाला कुठे जुमानतात?’’ जनार्दन कारमपुरी, अध्यक्ष, पद्मशाली ज्ञाती संस्था