आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मशाली संस्था कारवाईवर ठाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पद्मशाली शिक्षण संस्थेने कब्जा केलेली भवानी पेठेतील जागा ताब्यात घेण्यासाठी केलेल्या कारवाईवर ज्ञाती संस्थेने रविवारी ठाम भूमिका घेतली. समाज हाच सर्वोच्च असून, त्याच्या हिताआड येणार्‍या बाबी धुडकावून लावण्याचा निर्धार विश्वस्त मंडळाच्या बैठकीत झाला.

भवानी पेठेतील (कै.) राजम्मा कोंडी यांची घरजागा ज्ञाती संस्थेला दानरूपाने मिळाली. शिक्षण संस्थेच्या रामदास इप्पाकायल शाळेचे वर्ग तेथे सहा वर्षांपासून भरत होते. मंगल कार्यालय बांधण्यासाठी ज्ञाती संस्थेने जागा सोडण्याविषयी शिक्षण संस्थेला वारंवार कळविले. प्रतिसाद न मिळाल्याने ज्ञाती संस्थेने तेथील साहित्य कन्ना चौकातील मद्दा मंगल कार्यालयात ठेवले. पत्रे काढली, भिंतीही पाडल्या. या पार्श्वभूमीवर पुढील निर्णय घेण्यासाठी रविवारी विश्वस्त मंडळाची बैठक मार्कंडेय मंदिरात झाली. तीत झालेली कारवाई योग्यच असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. शिक्षण संस्थेने साहायक धर्मादाय आयुक्तांकडून लादलेल्या चौकशीलाही सामोरे जाण्याचे ठरले. या वेळी अध्यक्ष जनार्दन कारमपुरी, सरचिटणीस अजय दासरी, ज्येष्ठ विश्वस्त डॉ. पुरणचंद्र पुंजाल, भूमय्या गड्डम, भूमय्या येमूल, रामकृष्ण कोंड्याल, अशोक आडम आदी उपस्थित होते.

ते म्हणतात बांधून द्या
शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी कोंडी यांची घरजागा जशी होती तशी बांधून द्या; सहा महिन्यांत पर्यायी जागा शोधतो, असे म्हटले आहे. त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावताना ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष कारमपुरी यांनी, कन्ना चौकातील ज्ञाती संस्थेच्या मद्दा मंगल कार्यालयाची जागा पर्यायी म्हणूनच दिली आहे. तिथे वर्ग भरवण्याविषयी कसलीच अडचण नाही. केवळ प्रतिष्ठेपायी ही मागणी आहे. समाजाला आव्हान देण्याचा हा प्रकार असल्याचे श्री. कारमपुरी म्हणाले.