आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक पारदर्शकतेसाठी ‘पेड न्यूज’ गुन्हा ठरवावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पेड न्यूजला गुन्हा ठरवण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून चालू आहे. तसे सुतोवाच निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी केले आहे. पेड न्यूजमध्ये प्रसारमाध्यमे, उमेदवार आणि सामान्य नागरिक या स्तरावर भ्रष्टाचार होतो, अशी भीतीही निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. राजकारणातील गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे. पेड न्यूज देणे हा कायदा करण्याबाबत राजकीय पक्षांचे व नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले. पेड न्यूज गुन्हा ठरला तर निवडणूक कामात पारदर्शकता येईल, असे मत बहुतेक नागरिकांनी नोंदवले आहे.

उमेदवारीच रद्द करावी
पेड न्यूजमुळे प्रामाणिक काम करणार्‍या उमेदवाराचा निकाल धोक्यात येऊ शकतो. कोट्यवधी रुपये खर्च करून माध्यमांना ताब्यात ठेवणार्‍यांना त्याचा मोठा फायदा होतो. पैसा ओतून सामान्य मतदारांवर परिणाम होईल, अशा बातम्या छापून घेणे म्हणजे मतदारांची दिशाभूल असते. ती लोकशाही पद्धतीची निवडणूक नाहीच, असे आम्ही समजतो. नुकत्याच दिल्लीत झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप व आम आदमी पक्षानेही प्रचंड पैसा खर्च केल्याचे सांगण्यात येते. सर्वच प्रमुख पक्ष हा प्रकार करतात. तो बंद करण्यासाठी पेडन्यूजवर ‘निवडणूक गुन्हा’ म्हणून नोंदवताना, लगेच संबंधित उमेदवाराची उमेदवारीच रद्द केली पाहिजे आणि आजन्म त्याला निवडणुकीत उभे राहता येणार नाही, अशी तरतूद केली पाहिजे.’’ नरसय्या आडम, माजी आमदार

पेड न्यूजला आळा आवश्यक
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी कायदा विभागाकडे पेड न्यूजला निवडणूक गुन्हा ठरवण्याबाबात कायदा करण्यात यावा, याबाबतची केलेली शिफारस अत्यंत योग्य आहे. सर्वसामान्यांना धनदांडगे, सत्ताधारी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणे शक्य होत नाही, याचे कारण निवडणुकीच्या काळातील वार्तांकन कसे होते, हे एक उघड सत्य सर्वांना माहीत आहे. स्वत: मलाही याचा अनुभव आला आहे. लोकांचे सरकार स्थापन करायचे असेल, लोकांचे प्रतिनिधी निवडून यावे असे वाटत असेल तर पेड न्यूजला आळा घालणे गरजेचेच आहे. याबाबतचा कायदा व्हावा, कडक अंमलबजावणीही व्हावी.’’ पुरुषोत्तम बरडे, शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख

पेड न्यूजला आळा हवाच
तसे पाहता हा कायदा संमत होणे गरजेचे आहे. मुख्य निवडणूक आयुक्त संपत यांनी कायदा विभागाकडे पेड न्यूज ला निवडणूक गुन्हा ठरवण्याबाबात कायदा करण्यात यावा, यासाठी केलेली शिफारस योग्य म्हणावी लागेल. सर्वसामान्यांना सत्ताधार्‍यांविरुद्ध निवडणूक लढवणे शक्य होत नाही. लोकांचे सरकार स्थापन करायचे असेल, लोकांचे प्रतिनिधी निवडून यावे, असे वाटत असेल तर पेड न्यूजला आळा घालणे गरजेचेच आहे. याबाबतीत अजून कडक असा कायदा व्हावा अशी इच्छा आहे.’’ बाबासाहेब भवर, युवासेना

असे कायदे व्हावेत
कायदा हा कायदाच असतो. शिवाय कायद्याचे पालन करणे अनिवार्य असते. निवडणुकीच्या वार्तांकनासंदर्भात असणारा हा कायदा संमत व्हावा. कारण यामुळे बर्‍याच गोष्टी समोर येतील. कामकाजात पारदर्शकता येईल. प्रत्यक्षात अंमलबजावणी मिळाल्यावर वेगवेगळे पक्ष स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी काय काय फंडे वापरतील हे पाहण्यासारखे असेल. या कायद्याच्या अंमलबजावणीने खरे लोकप्रतिनिधी निवडून येतील.’’ अँड. राजकुमार एस. म्हात्रे

निष्कर्ष ठरवावेत
पेड न्यूजला चुकीचे ठरवताना प्रथम पेड न्यूजचे निष्कर्ष ठरवावेत. तसेच पेड न्यूज सिद्ध करणे अवघड आहे. असा नियम तयार करताना प्रसिद्धी माध्यमांना सोबत घ्यावे. अन्यथा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या स्वातंत्र्यावर गदा येईल.’’ प्रकाश यलगुलवार, माजी आमदार