आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणच्या दांपत्यास 37 दिवसांनी भेटला ‘विठू’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुर्डुवाडी (जि. सोलापूर) - आषाढी वारीपूर्वी पंढरपूरमध्ये हरवलेला 12 वर्षांचा मुलगा 37 दिवसांनी कुर्डुवाडी शहरात सापडला. रविवारी पोलिसांनी त्याला आई-वडिलांकडे सुपूर्द केले. तब्बल महिन्यानंतर सापडलेल्या मुलाला पाहून आईला अश्रू अनावर झाले होते.


दशरथ सूर्य मुळीक, मंगल मुळीक व त्यांचा मुलगा विठ्ठल (रा.पैठण) हे आषाढी यात्रेसाठी 17 जूनपासून पंढरपूरमध्ये आले होते. त्यांनी पंढरीत भाड्याने खोली घेतली होती. 21 जून रोजी विठ्ठल घरातून बाहेर पडला. मात्र, सायंकाळपर्यंत परतलाच नाही. आई- वडिलांनी त्याचा शोध घेतला. मात्र, यात्रेच्या गर्दीमध्ये तो सापडला नाही. अखेर पोलिसात तक्रार देण्यात आली. वडील व घरमालकांनी मोडनिंब, शेटफळ व कुर्डुवाडीत जाऊन विठ्ठलचा फोटो दाखवत विचारणा केली. मात्र, शोध लागला नाही.


कुर्डुवाडीतील उद्योगपती श्याम बोराडे व आनंद बोराडे यांना विठ्ठल शहरात फिरताना दिसला. त्यांनी विठ्ठलची विचारपूस करून पोलिस ठाण्यात आणले. पंढरपूरमध्ये ‘मिसिंग’ची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळताच कुर्डुवाडी पोलिसांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधला.


ही बातमी मुळीक दांपत्यालाही कळवण्यात आली. मग क्षणाचाही विलंब न करता हे दांपत्य कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात आले. आईला पाहून मुलाने आनंदाने हाक मारून गळाभेट घेतली. याप्रसंगी आई, वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.