आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchayat Committee Member And Son Attack On Dalit Family

माळशिरस तालुक्यात पंचायत समिती सदस्या व मुलाचा दलित कुंटूंबावर हल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - स्थगिती आदेश असलेल्या जमिनीचे व्हिडिओ शूटिंग करण्याच्या वादातून पानीव (ता. माळशिरस) येथे पंचायत समिती सदस्या श्रीलेखा पाटील व त्यांचा मुलगा अभिषेक पाटील यांच्यासह 25 जणांवर दलित कुटुंबावर हल्ला करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. श्रीलेखा पाटील व त्यांच्या मुलास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली आहे. सहाजण जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी परस्पविरोधी फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी जगन्नाथ तोरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अभिषेक पाटील, श्रीलेखा पाटील, तानाजी भोसले, शंकर भोसले, सचिन बाबर, संतोष निंबाळकर, संभाजी निंबाळकर, उमेश डोंबाळे, नाथाजी साठे, भरत बाबर, विजय बाबर, रणजित पाटील, अतुल खवळे, सनी इंगोले, जगन्नाथ जाधव, पंडित देशमुख, महावीर लावंड, महादेव रोकडे, सतीश कुलाळ, संतोष कुलाळ, विकास बाबर, सूर्यकांत शिंदे, सागर खवळे, रामचंद्र मदने, विनोद दनाने (सर्व जण रा. पानीव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. किरण तोरणेसह, विकास नामदेव सोरटे, दत्तू तोरणे, सुनीता प्रदीप सोरटे, रूपाली लक्ष्मण तोरणे, देवयी तोरणे, सुनील नामदेव तोरणे हे जखमी आहेत.

तोरणे यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सायंकाळी किरण तोरणे हा पानीव गावातील एका जमिनीचे व्हिडिओ शूटिंग करत होता. या जमिनीच्या व्यवहारावर न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. यादरम्यान, श्रीलेखा पाटील आणि त्यांचे सहकारी जगन्नाथ तोरणे यांच्या घरासमोर आले. तेथे त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून सत्तूर, गज, पाइप, काठ्या व दगडांनी त्यांचे आई, वडील भाऊ, भावजय व पुतण्या यांना मारहाण केली. या मारहाणीत तोरणे यांच्या आई देवयी तोरणे या तोंडावर तलवारीचा वार लागल्याने गंभीर जखमी झाल्या. तर किरण तोरणे यांच्या छपराच्या घराला आग लावण्यात आली, असे जगन्नाथ तोरणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, श्रीलेखा पाटील यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार जगन्नाथ तोरणे यांचा पुतण्या किरण तोरणे हा जमिनीचे व्हिडिओ शूटिंग करीत होता. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने काठ्या, दगडाने हल्ला केला. गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र व त्यांचा मुलगा अभिषेक पाटील यांचे गाळ्यातील पाच तोळ्याचे लॉकेट जबरदस्तीने काढून घेतले तसेच मारहाण केली. त्यात विकास बाबर, संतोष निंबाळकर, वैशाली गोफणे, सोनाली ठवरे, तानाजी भोसले, मनोहर साठे, रामभाऊ मदने, संतोष कुलाळ, सूर्यकांत शिंदे व चंद्रकांत शिंदे हे जखमी झाले असल्याची फिर्याद श्रीमती पाटील यांनी अकलूज पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार त्यांनी जगन्नाथ तोरणे, किरण तोरणे, रवींद्र तोरणे, राणी तोरणे, उज्ज्वला शिंदे, देवयी तोरणे, दत्तू तोरणे, विकास तोरणे, विजय तोरणे, छगन तोरणे, सुनीता तोरणे (सर्व जण रा. पानीव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.