आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchayat Samiti Passed A Resolution To Transfer The Officer Inactive

कृषी अधिकाऱ्याच्या बदली ठरावाकडे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ- तालुक्यात विविध शासकीय योजना राबवण्याचे महत्त्वपूर्ण काम पंचायत समिती करते. या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची असते. मात्र मोहोळ तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्याकडूनच शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. या निष्क्रिय अधिकाऱ्याच्या बदलीचा पंचायत समितीने ठराव केला. परंतु, वरिष्ठ पातळीवरून या ठरावाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना कृषी कार्यालयामार्फत राबवण्यात येतात. मात्र या कार्यालयातील अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी सी. पी. मंगरूळे हे योजनांची समाधानकारक माहिती देत नसल्याच्या तक्रारी आल्यामुळे त्यांच्या बदलीचा ठराव दि. २० एप्रिल २०१५ च्या मासिक बैठकीत मंजूर केला.
अनगरच्या पंचायत समिती सदस्या सुनंदा गुंड यांनी ठराव मांडला. त्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ही सभा तत्कालीन गटविकास अधिकारी आशालता सुरवसे, सभापती अंबिका पाटील आदींच्या उपस्थितीत झाली होती. या ठरावाच्या प्रती विभागीय कृषी सहसंचालक पुणे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांना पाठवण्यात आल्या होत्या.
पंचायत समितीचा ठराव होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी अनेकवेळा संबंधित कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याला केराची टोपली दाखवण्यात आली होती. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या बदली ठरावाचीही परिस्थिती झाल्याची चर्चा शेतकऱ्यामधून मोठ्या प्रमाणात होत आहे.
समक्ष चर्चा करू
- सध्या मी बाहेर आहे. आपण कार्यालयात या. नंतर याविषयी समक्ष चर्चा करू.”
सी. पी. मंगरूळे, तालुका कृषी अधिकारी, मोहोळ
बदलीचा अधिकार नाही
- ठरावाची प्रत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवली आहे. बदली करण्याचा अधिकार मला नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचना अमलात आणू.”
रफिक नाईकवाडे, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर