आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तांच्या स्वागतासाठी पंढरपूरनगरी सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी येथे येणा-या भाविकांना श्री विठ्ठल - रुक्मिणीमातेचे दर्शन अधिक सोयीस्कर घडण्यासाठी मंदिर समितीकडून सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती, समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली. गतवर्षी आषाढी यात्रेसाठी झालेली भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यंदाच्या यात्रेचे नियोजन केल्याचे सांगून कार्यकारी अधिकारी तेली म्हणाले, ‘‘यंदा 9 जुलैला आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह सात मुख्य संतांच्या पालख्या जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने येत आहेत. त्यामुळे भाविकांची गर्दी वाढत आहे.

भाविकांचा ऊन, वारा व पावसापासून संरक्षणासाठी गोपाळपूर रस्त्यावर कायमस्वरूपी चार तर खास यात्रेसाठी जादा पाच पत्राशेड उभे केले आहेत. या सर्व पत्राशेडमधून सुमारे 35 ते 40 हजार भाविक दर्शनरांगेत उभे राहू शकतील. पदस्पर्श दर्शनरांगेचे रांझणी रस्त्यावरील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढेपर्यंत नियोजन केले आहे. पूर्ण दर्शनरांगेवर प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन टाकले आहे. रांगेला लाकडी बांबूंचे बॅरेकेडिंग लावले आहेत. पदस्पर्श दर्शनरांगेतील गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडमधील भाविकांना पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी नगरपालिकेने टँकर व नळाची व्यवस्था केली आहे. मंदिर समितीने भाविकांना पाणी देण्यासाठी 100 ते 150 मुलांची नेमणूक केली आहे. वर्टी एजन्सीकडूनही पाण्याच्या पाऊचचे देण्यात येणार आहेत.
आजपर्यंत सुमारे 75 हजार भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग केले आहे. यात्रेच्या काळात दररोज ऑनलाइन बुकिंग केलेल्या सहा हजार 600 भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येईल. गतवर्षी चार ते आठ दिवस आधी ऑनलाइन बुकिंग करावे लागत होते. यंदा रोजच्या रोज बुकिंगची सोय उपलब्ध केली आहे. परिणामी भाविकांना बुकिंग करणे सुलभ झाले.

यात्राकाळात भाविकांकडून देणगी पावत्यांद्वारे मंदिर समितीला मोठी देणगी मिळते. पुणे येथील विठ्ठल सेवा मंडळाच्या 150 पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी ही देणगी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आठ तासांची एक पाळी अशा तीन पाळ्यांमध्ये ते काम करतील.

वाढती गर्दी, वाढते उत्पन्न
बुधवारी सुमारे 22 हजार 500 भाविकांनी मुखदर्शन घेतले, तर सुमारे 39 हजार भाविकांनी पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेतला. मंदिरात मंगळवारी विठ्ठलचरणी दोन लाख 14 हजार तर बुधवारी दोन लाख 23 हजार रुपये ओवाळणी दक्षिणा जमा झाली. तसेच, समितीकडे पाच लाख 13 हजार देणगी पावत्यांद्वारे जमा झाली.
अशी असेल सुरक्षा व्यवस्था
नातेपुते (ता.माळशिरस) येथील 60 कमांडो, कोल्हापूर येथील व्हाइट आर्मी संस्थेचे 60 जवान येथे दाखल झाले आहेत. मंदिर समितीने मंदिराच्या सुरक्षेसाठी मंदरिात, दर्शन मंडप, गोपाळपूर रोड येथील पत्राशेड आदी भागात सुरक्षा कर्मचा-यांची नेमणूक केली आहे. मंदिरात 52 ठिकाणी, मंदिराबाहेर 20, पत्राशेड येथे चार, दर्शन मंडपात दोन सीसीटीव्ही बसवले आहेत.