आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लगबग यात्रेची : यात्रा काळात भाविकांसाठी गॅस, केरोसीनचे केले नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी यात्रेत सहभागी भाविकांना स्वयंपाकासाठी एक लाख 20 हजार लिटर केरोसीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बरोबरच यात्रा कालावधीत मागेल त्या भाविकांना अनुदानित दरानुसार गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे. केरोसीन आणि गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथकाची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी पी. बी. वायदंडे यांनी दिली.

आषाढी यात्रेचा सोहळा केवळ आठ दिवसांवर आहे. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात. आषाढी सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर माउली, श्री संत तुकाराम महाराज या प्रमुख सतांच्या पालख्यांसह लहान-मोठ्या दिंड्यांमधून सहभागी झालेल्या भाविकांसाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत सवलतीच्या दरात केरोसीन तसेच गॅस सिलेंडरचा दरवर्षी पुरवठा करण्यात येत असतो.

आषाढी यात्रेसाठी येणा-या भाविकांची संख्या लक्षात घेऊन तालुका पुरवठा विभागाने 2 लाख 80 हजार लिटर केरोसीन उपलब्ध व्हावे अशी मागणी केली होती. मात्र, जिल्हा पुरवठा विभागाकडून 1 लाख 20 हजार लिटर केरोसीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केरोसीनची वाखरी पालखी तळासह पंढरपूर शहरामध्ये एकूण 53 ठिकाणांहून वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या बरोबरच जिल्हा पुरवठा विभागाकडून गॅस सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्यासोबत येणा-या भाविकांना अनुदानित दरामध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या गॅसचे वितरण शहरातील अश्विनीता आणि बालाजी गॅस एजन्सीमार्फत करण्यात येणार आहे. या दोन्ही गॅस एजन्सीकडे मिळून सध्या दहा हजार गॅस सिलिंडर असल्याचेही वायदंडे यांनी सांगितले.

पालखी तळांवर व्यवस्था
शहरातील वितरण व्यवस्थेशिवाय तालुक्यातील पिराची कुरोली, भंडीशेगाव व वाखरी येथील पालखी तळावर गॅस सिलिंडर वितरणासाठी कासेगाव, करकंब आणि भोसे येथील ग्रामीण वितरकांचे सहकार्य घेण्यात येत आहे. या शिवाय पालखी मार्गावरील गावांना केरोसीनचा कोटा वाढवला आहे.
प्रशासनाने अशी केली तयारी
- 1 लाख 20 हजार लिटर केरोसीनचा साठा उपलब्ध.
- पालखी तळांसह शहरात 53 ठिकाणी केरोसीन वितरणाची व्यवस्था.
- केरोसीन व गॅस सिलिंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी अधिकाºयांच्या 27 पथकांची नियुक्ती.
- हलगर्जीपणा करणाºया वितरकांचे परवाने त्वरित रद्द करणार.
- यात्रेत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वितरणाच्या ठिकाणी केरोसीन तसेच गॅस सिलिंडर अगोदरच पोहोच होणार.