आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष : पंढरपूरकरांच्या आठवणीत राहतील आबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील तथा आबा यांचा तीर्थक्षेत्र पंढरपूरशी जवळचा ऋणानुबंध होता. त्यांची श्री विठ्ठलावर अपार श्रद्धा होती. मंत्री असताना वारकऱ्याच्या वेशात संरक्षणाविना रिक्षात फिरून वारकऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी केली होती.
आपल्यासोबतच्या शासकीय लवाजम्याचा यात्रेत त्रास नको म्हणून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी स्टेशन रस्त्याने चालत जाणारे आबा आज पंढरपूरकरांच्या चांगलेच स्मरणात आहेत.
आषाढी-कार्तिकी यात्रेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी पालकमंत्री म्हणून ते आवर्जुन उपस्थित राहात. उपमुख्यमंत्री असताना सलग तीन ते चार वेळा ते कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठलाच्या महापूजेला कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते.
एरव्ही सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावरही त्यांनी पंढरपुरात येऊन श्री विठ्ठलाचे आवर्जुन दर्शन घेतले होते. दर्शनासाठी आल्यानंतर चालणाऱ्या भाविकांना आपल्या गाड्यांच्या ताफांचा त्रास नको म्हणून, त्याचबरोबर वारीचीही जवळून पाहणी करता यावी यासाठी त्यांनी चक्क येथील विश्रामगृहापासून पायी चालत विठ्ठल मंदिराकडे गेल्याचे पंढरपूरकरांनी पाहिले आहे.
परिचारकांच्या वाड्यावर जेवणाचा आस्वाद

माजीआमदार सुधाकर परिचारक आणि आबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. केव्हाही पंढरपूरला आल्यानंतर ते परिचारकांकडे आवर्जुन येत असत. पालकमंत्री उपमुख्यमंत्री असताना प्रत्येक वेळी कार्तिकी यात्रेच्या पूर्वसंध्येला श्री विठ्ठलाच्या पूजेच्या निमित्ताने आल्यानंतर परिचारकांच्या वाड्यावर अनेक वेळा पूरणपोळी आणि कटाच्या आमटीचा त्यांनी आस्वाद घेतला होता.
वारकऱ्याच्या वेशात

आषाढीएकादशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री या नात्याने आबा येथे आले होते. तेव्हा दर्शन रांगेत पिण्याचे पाणी विकत घेऊन प्यावे लागते. वाळवंटामधील असुविधा, स्नानाप्रसंगी महिलांची टिंगळटवाळी आदी तक्रारींचा पाढा पत्रकारांनी त्यांच्या पुढे वाचला होता. त्या रात्री बाराच्या सुमारास वारकऱ्याचा वेशात रिक्षामधून प्रत्यक्ष पाहणी केली होती. पिण्याच्या पाण्यासह सोयी सुविधांबाबत वारकऱ्यांची विचारपूस केली होती. नंतर पंढरपूरमध्ये शासकीय अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली होती.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील श्री विठ्ठलाची पूजा करताना. छाया. उमेश टोमके