आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठुरायाची अठ्ठावीस युगांची प्रतीक्षा संपली! बहुजन पुजार्‍याच्या हातून प्रथमच पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - कधीकाळी जेथे अस्पृश्यांना पाय ठेवण्यासही बंदी होती, त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शुक्रवारी नवा इतिहास घडला. मंदिराच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बहुजन पुजार्‍याच्या हातून विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची महिला पुजार्‍याकडून पूजा करण्यात आली आणि जणू साक्षात विठ्ठल आणि विठ्ठलभक्तांची अठ्ठावीस युगांची प्रतीक्षाच संपली!
जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार विठ्ठल मंदिर समितीने ब्राह्मणांबरोबरच बहुजनांनाही विठ्ठलाची पूजा करण्याची परवानगी देण्यााचा निर्णय घेतला आणि दोन महिलांसह विविध जातींमधील 11 पुजार्‍यांची मंदिरात नियुक्ती केली. शुक्रवारी या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली आणि मंदिराच्या इतिहासात नव्या अध्यायाची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. विरोधाचे सूर उमटूनही मंदिर समिती निर्णयाच्या अंमलबजावणीवर ठाम राहिल्याने सर्वांचेच या पूजेकडे लक्ष लागले होते.
विठ्ठलाच्या मूर्तीस स्नान घालण्यापासून ते पोशाख परिधान करण्याचे सर्व विधी, पूजा नव्या पुजार्‍यांनी पार पाडले. पंढरपूरच्या रहिवाशी असलेल्या नवनियुक्त महिला पुजारी उर्मिला भट यांनी रूक्मिणी मातेची पूजा केली.
काकडा पूजा आणि मंत्रपठणही : नेहमीच्या प्रथेप्रमाणे नव्या पुजार्‍यांनी काकडा पूजा केली. विधिवत मंत्रपठणही केले. या मंत्रोच्चाराने वातावरण भारून गेले होते.

संत नामदेवही धन्य झाले...
संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचे 17 वे वंशज केदार नामदास यांनी शुक्रवारी विठ्ठलाची विधिवत पूजा केली. संत नामदेवांच्या वंशजाला पूजेची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

समतेची दिंडी
बहुजन पुजार्‍यांच्या हातून विठ्ठल- रुक्मिणीची पूजा झाल्याने युगानुयुगांचा भेदभाव संपला आणि विठ्ठल मंदिरातून खर्‍या अर्थाने समतेची दिंडी निघाली. आता ही दिंडी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.