आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्री एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - राज्याच्या विविध भागांतून पंढरीत आलेल्या लाखो वारकर्‍यांनी शुक्रवारी चैत्री एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेतला. चंद्रभागेच्या वाळवंटात स्नानासाठी वारकर्‍यांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याने चंद्रभागेचा तीर वारकर्‍यांनी फुलून गेला होता. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग सारडा भवनपर्यंत पोहोचली होती. मात्र, मागील चैत्री यात्रेपेक्षा यंदा भाविकांची संख्या रोडवल्याचे चित्र दिसत होते. सर्वत्र टाळ मृदंगाच्या गजर आणि वारकर्‍यांच्या ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या नामघोषाने चंद्रभागेच्या वाळवंटाचा परिसर दणाणून गेला होता.

चंद्रभागा स्नानानंतर विविध संतांच्या दिंड्या शुक्रवारी प्रदक्षिणा मार्गावर नगरप्रदक्षिणेसाठी दाखल होत होत्या. नगरप्रदक्षिणा मार्गावर दिंड्यांसोबत वारकर्‍यांची गर्दी होती. विठ्ठल मंदिर परिसरातील पश्चिमद्वार आणि महाद्वाराचा परिसर एकादशीनिमित्त वारकर्‍यांच्या गर्दीने फुलून गेला होता. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श, मुखदर्शन, ऑनलाइन दर्शन सुविधेमुळे वारकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य : श्री संत एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांनी विजयनगर येथून परत पंढरपुरात श्री विठ्ठल मूर्ती आणली. चैत्री एकादशी दिवशी पुन्हा येथे श्री विठ्ठलमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. चैत्र एकादशी या दिवशी दुपारी दाखवल्या जाणार्‍या नैवेद्यात एकादशी असली तरी खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यंदाही त्याचे भक्तिभावाने पालन झाले.

चैत्री एकादशीला पुन्हा येथील मंदिरात श्री विठ्ठलमूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याने चैत्री यात्रेस भाविकांच्या दृष्टीने वेगळे महत्त्व आहे.