आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी यात्रा होईपर्यंत विठ्ठल मंदिर दर्शन चोवीस तास खुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- अधिक मास असल्यामुळे रविवारपासून आषाढी यात्रा होईपर्यंत श्रीविठ्ठलाचे दर्शन चोवीस तास सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. यासाठी शासनाच्या परवानगीची गरज नाही. श्रीविठ्ठल मंदिर अधिनियमन कायद्यातील तरतुदीनुसार भाविकांच्या सोईसाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यास मंदिर समितीला अधिकार आहे. त्या अधिकारानुसारच आषाढी यात्रा होईपर्यंत विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाने अण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांची कार्यरत असलेली मंदिर समिती बरखास्त करून जिल्हाधिकाऱ्यांना मंदिराचे कामकाज पाहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी संपूर्ण मंदिराची, ज्ञानेश्वर दर्शन मंडपाची पाहणी केली. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनादेखील केल्या.

मुंढे म्हणाले, भाविकांना कमीत कमी वेळात श्रीविठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी आपला प्रयत्न आहे. आषाढी यात्रेनंतर योग्य निर्णय घेण्यात येईल. माघी व चैत्री यात्रेच्या वेळी विठ्ठलाचे दर्शन चोवीस तास सुरू राहील याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिली होती. विठ्ठल मंदिर अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समिती असा निर्णय घेऊ शकते. यामध्ये शासनाच्या परवानगीचा प्रश्नच येत नाही. याबरोबरच येत्या आषाढी यात्रेच्या वेळी दशमी, एकादशी व द्वादशी असे तीन दिवस आॅनलाइन दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. दर्शन मंडपात सुधारणा करुन भाविकांना दर्शन घेताना त्या ठिकाणी त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
बातम्या आणखी आहेत...