आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

.. तर रोज विठ्ठल मंदिरात पुरूषसूक्त पठण करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या पूजेप्रसंगी पुरूषसूक्त म्हण्ण्यास आणि मूर्तीस रेशमी वस्त्रे परिधान करण्यास श्रमिक मुक्ती दलाचे डॉ.भारत पाटणकर यांनी घेतलेल्या आक्षेपाच्या विरोधात हिंदूत्ववादी संघटना, वारकरी, महाराज मंडळी आणि काही पत्रकारांनी सोमवारी रात्री बैठक घेतली. वारकरी नसलेले प्रसिद्धीलोलूप मूठभर लोकांच्या आक्षेपावरुन पुरुषसुक्त म्हणणे बंद केल्यास रोज मंदिरात शेकडो वारकर्‍यांसह पुरुषसूक्ताचे पठण करण्याचा इशारा देण्यात आला.

देशात हजारो वर्षांपासून काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व पुरुष देवतांच्या मंदिरात पूजेवेळी पुरुषसूक्त म्हटले जाते. ते वेदात आहे. त्यात जातीय काहीही नाही; परमेश्वराचेच वर्णन आहे. एकनाथ महाराजांनी भागवतात पुरुषसूक्त पूजेवेळी म्हणावे, असे सांगितले आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदायाने कधीही याला विरोध केला नाही. श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर कायद्यानुसार मंदिरातील नित्योपचार, उत्सव, परंपरा यात कोणताही बदल करता येणार नाही. तसे झाल्यास त्याला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. काहीनी पाटणकरांना पंढरपुरात येऊ न देण्याची भूमिका मांडली.

पाटणकर हे प्रसिध्दीसाठी अशी वक्तव्ये करीत आहेत. जे देवच मानत नाहीत त्यांना त्याबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही. देव मानणारे अशी वक्तव्ये करुच शकत नाहीत. पिढय़ान्पिढय़ांपासून सुरू असलेले पुरुषसूक्ताचे पठण थांबणार नाही, असे धर्म, संस्कृती संरक्षण समितीचे प्रमुख भीमाचार्य वरखेडकर म्हणाले.

संतांचा आक्षेप नाही
हजारो वर्षांपूर्वी जेव्हा जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती तेव्हा पुरुषसूक्ताची निर्मिती झाली आहे. देशभरातील प्रमुख देवळांमध्ये पूजेवेळी पुरुषसूक्ताचे पठण केले जाते. श्री विठ्ठल मंदिर अधिनियम बनवतानाही निवृत्त न्यायमूर्ती नाडकर्णी यांनी याचा अभ्यास करुनच शासनाला अहवाल दिला होता. या परंपरेला संतमहंतांचा आक्षेप नाही. मग देव न मानणार्‍या डॉ. पाटणकरांना आक्षेप असण्याचे कारण काय?, असा सवाल वा.ना.उत्पात यांनी उपस्थित केला.