आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pandharpur Vitthal Temple News In Marathi, Divyamarathi

माघीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत भक्तांची मांदियाळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- माघी एकादशीच्या सोहळ्यास उपस्थित राहून राज्य व परराज्यातून आलेल्या लाखो वारकर्‍यांनी सोमवारी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. स्नानासाठी वारकर्‍यांनी पहाटेपासून गर्दी केल्याने चंद्रभागेचा तीर वारकर्‍यांनी फुलून गेला होता. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठीही अलोट गर्दी झाली होती. ही रांग सोमवारी (दि. 10) पत्राशेडपर्यंत पोहोचली होती.

मंदिर व चंद्रभागेचा परिसर पहाटेपासूनच भाविकांनी फुलून गेला होता. टाळ-मृदंगाच्या गजरात वैष्णवजनांकडून केल्या जात असलेल्या ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. चंद्रभागा स्नानानंतर विविध संतांच्या दिंड्या प्रदक्षिणा मार्गावर नगर प्रदक्षिणेसाठी दाखल होत होत्या. नगरप्रदक्षिणा मार्गावर एक एक संतांच्या दिंड्या दुपारपर्यंत नगर प्रदक्षिणा पूर्ण करीत असल्याचे दिसत होते.

पश्चिमद्वार तसेच महाद्वारात वारकर्‍यांची गर्दी झाली होती. र्शी विठ्ठल व र्शी रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श, मुखदर्शनाचा ऑनलाइन पद्धतीने असलेल्या सुविधेचा भाविकांनी लाभ घेतला. कैकाडी महाराज, तनपुरे महाराज तसेच गजानन महाराज मठांमधून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसत होत्या. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तसेच शहरातील र्शी विठ्ठल मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावरील मोठे वाडे, मठ आणि धर्मशाळांमधून रात्रभर हरिजागर सुरू होता. प्रदक्षिणा मार्गावर स्थानिक तसेच परगावच्या व्यापार्‍यांनी चिरमुरे, कुंकू, बुक्का, उदबत्ती पुडे, देवदेवतांच्या धातूच्या मूर्ती, फोटोफ्रेम आदी प्रासादिक वस्तूंच्या तसेच चादरी, घोंगडी आदींची अशी दुकाने थाटलेली आहेत.

आम्ही धन्य झालो..
विठ्ठलाच्या दर्शनाने भारावून गेलो आहे. सहा तासांनंतर श्री विठ्ठलाचे दर्शन झाले. आपण कुटुंबीयांसमवेत जालन्याहून आलो आहे. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची थोडी गैरसोय झाली.
- भिकाजी दत्तू पाटील, जालना