आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष यात्रा - परिवर्तनासाठी उभी आहे, साथ द्या - पंकजा मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माझे दु:ख, वेदना बाजूला ठेवले आहे. वडील गेले म्हणून घरात बसून रडणारी मी नाही, मैदानात उतरून लढणारी आहे. सामान्य माणूस शासनकर्ता व्हावा, हे वडिलांचे स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता आणि परिवर्तनासाठी आपल्यासमोर उभी आहे. तुम्ही आहात माझ्यासोबत... अशी भावनिक हाक देत स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना हात वर करा मूठ आवळा अन् घ्या शपथ... असे आवाहन केले.

आमदार पंकजा मुंडे यांची राज्यभरात संघर्ष यात्रा सुरू आहे. या यात्रेचे सोमवारी जल्लोषात स्वागत झाले. त्यानंतर शिवस्मारक सभागृहात झालेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. सात मिनिटांच्या भाषणात पंकजा यांनी उपस्थितांच्या भावनेला हात घातला. वडिलांच्या आठवणीने स्वत:ही गहिवरल्या, पण ठाम बोलल्या. महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षांपासून आघाडीचे सरकार ठाण मांडून बसले आहे.
ब्रिटिश सरकारपेक्षा भयानक हाल आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेचे केले आहेत. आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. तसेच बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार याला जबाबदार असणाऱ्या भ्रष्ट सरकारला खाली खेचण्याची वेळ आता आली आहे. आणीबाणीच्या काळात, स्व. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी शासनाच्या विरोधात संघर्ष केला. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी राज्यभर फिरत आहे. यंदा राज्यात परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या, वडिलांचे छत्र अचानक निघून गेले. या धक्क्यातून सावरायला वेळ लागला. लोक माझ्यात साहेबांना बघतात, पण मी तुमच्यात साहेबांना बघते. असे म्हणत त्या गहिवरल्या. व्यासपीठावर खासदार अॅड. शरद बनसोडे, यात्रेचे प्रमुख सुजितसिंह ठाकूर, आमदार विजयकुमार देशमुख, संघटनमंत्री सुनील कर्जतकर, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते.
सभेतील ठळक घडामोडी
माजी नगरसेवक बाळू पाटील, बाबूभाई मेहता, शिवराज गायकवाड यांचा भाजपमध्ये प्रवेश
शिवस्मारक मैदानात सुमारे हजार नागरिकांची उपस्थिती पुढील कार्यक्रमास विलंब होत असल्याने आटोपते भाषण सभा सुरू होण्यास तीन तास उशीर संघर्ष रॅली नसून विजयी रॅली
रॅलीला मिळलेला प्रतिसाद बघून पंकजा मुंडे म्हणाल्या, आता विधानसभा निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचाराला येण्याची गरज नाही. ते निश्चित निवडून येतील. आताची सोलापुरातील ही संघर्ष रॅली नसून, विजयी रॅली आहे, असेही त्या म्हणाल्या.

शहरातील वाहतूक अडीच तास विस्कळीत
आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेमुळे सोमवारी सकाळी अकरा ते दुपारी दीड दरम्यान जुना पुणे नाका ते शिवाजी चौक या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. स्वागत कमानी, रस्त्यावर लावलेली वाहने यामुळे वाहतूक जॅम झाली. जुना पुणे नाका पुलापर्यंत वाहनांची रांग गेली होती. प्रवासी, नागरिक यांना मन:स्ताप झाला. सहायक पोलिस आयुक्त महिपती इंदलकर, जनार्दन तिवटे, पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के, अरुण वायकर, सूर्यकांत पाटील यांच्यासह शंभरहून अधीक पोलिसांचा फौज फाटा होता.

पोलिसांचे नियोजन नाही
दरम्यान दुपारी साडेबारानंतर एसटीबस बुधवारपेठ सम्राट चौक मार्गे वळवण्यात आली. तरीही वाहतूक विकस्ळीतचा फटका बसला. पोलिसांनी यात्रेपूर्वीच नियोजन केले असते तर हा प्रकार घडला नसता. मात्र, संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे वाहतूक नियोजन िदसून आले नाही. म्हणजे एसटीबसला पर्यायी मार्ग देणे.
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना नाक्याबाहेर थांबण्याच्या सूचना देण, यात्रा काळापुरते फेरीवाल्यांवर यात्रा मार्गावर थांबू न देणे, एका बाजूने यात्रा दुसऱ्या मार्गाने इतर वाहने सोडली असती तर वाहतूक सुरळीत झाली असती. शिवाय पोलिस नोटीफिकेशन काढून काही काळासाठी वाहतूक बंद करू शकले असते.
यात्रेचे झाले दिमाखात स्वागत
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे -पालवे यांच्या संघर्ष यात्रेचे सोमवारी सोलापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. गोपीनाथ मुंडे अमर रहे, अब की बार मोदी सरकारच, अशा घोषणा देत हजारो कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभाग घेतला.
पुणे नाका येथे दुपारी यात्रेचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात यात्रेचे स्वागत झाले. त्यानंतर शहर उत्तर विभागसभा मतदार संघातून रॅली काढण्यात आली. शिंदे चौकातील शिवस्मारक मैदानावर येथे यात्रेचा समारोप झाला. या वेळी खासदार अॅड. शरद बनसोडे, संघर्ष यात्रेचे प्रमुख सुजितसिंह ठाकूर, आमदार विजयकुमार देशमुख, सिद्रामप्पा पाटील, संघटनमंत्री सुनील कर्जतकर, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अशेाक निंबर्गी, अमर पुदाले, शोभा बनशेट्टी, अविनाश कोळी, संजय कोळी उपस्थित होते.
क्रेनने घातला हार
प्रारंभी बाळे येथे राजाभाऊ आलुरे, पांजरापोळ चौकात बिज्जू प्रधाने तर मराठा वस्ती परिसरातील धर्मवीर संभाजीराजे तालीम व नगरसेवक संजय कोळी यांच्या वतीने पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांना क्रेनने हार घालण्यात आले.
चित्ररथाने लक्ष वेधले
संघर्ष यात्रेत हजारो कार्यकर्त्यांसह हजार मोटारसायकलस्वार, चारचाकी वाहने सहभागी झाले होते. संघर्ष यात्रेतील चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.