आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दस्तावेज गायब; अनेक गैरप्रकार उघडकीस येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी तलाठी कार्यालयातून महत्त्वाचा दस्तावेज असलेले गाव नमुना नंबर 1 क हे रेकॉर्ड गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. कुळकायदा, सिलिंग, देवस्थान, वन, महारवतन, पाटीलवतन, कुलकर्णीवतन आदी सरकारी जमिनींच्या नोंदी गायब करण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांच्या जमिनींचा घोटाळा झाल्याची शक्यता आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्यास जमिनीचे भाव गगनाला भिडलेल्या परिसरातील अनेक गैरप्रकार उघडकीस येणार आहेत.

सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जमिनींना सध्या सोन्यापेक्षा अधिक भाव आलेला आहे. या परिसरात जमीन घ्यावयाची झाल्यास एकरासाठी एक कोटी रुपयांवर दर मोजण्याची तयारी असावी लागते. कोट्यवधी रुपये मोजायची तयारी असली तरी या परिसरात जमीन मिळणे मुश्किल झाले आहे.

संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष र्शीकांत डांगे यांनी माहितीच्या अधिकारात कोंडी येथील तलाठी कार्यालयात गाव नमुना नंबर एक या रजिस्टरची मागणी केली. तेथील तलाठी फडतरे यांनी असे उत्तर दिले आहे की, आपण येथे तलाठी पदाचा पदभार स्वीकारताना हे रेकॉर्ड आपल्याला ताब्यात मिळालेले नाही. यावरून हा सावळा गोंधळ बाहेर आला. याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आरमारचे डांगे यांनी तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडे केली.
गायब करण्याचा हेतू काय? : भोगवाटदार वर्ग दोनच्या नवीन शर्तीच्या जमिनींची नोंद गैरमार्गाने मंजूर केली असल्यास सर्व गैरप्रकार उजेडात येतील म्हणून हे रेकॉर्ड संबंधित दोषींकडून गायब केले जाऊ शकते. नवीन झालेल्या नोंदी रेकॉर्डवर दाखवायच्या नसतील तरी हे रेकॉर्ड गायब करण्यात येते. कोंडी येथील जमिनींना आज कोट्यवधी रुपयांचे भाव असल्याने सरकारी जमिनींच्या नोंदीमध्ये गैरप्रकार झाले असल्याची शक्यता बळावली आहे.
प्रकाराची चौकशी सुरू - नमुना एक क आढळून येत नाही, याबाबत चौकशी सुरू आहे. कोंडी तलाठी कार्यालयात आर. जे. भाईजान आणि यशवंत चिंचोळे हे दोन तलाठी पूर्वी कार्यरत होते. फडतरे तलाठी हे नवीन आहेत. भाईजान व चिंचोळे यांच्यात वाद असल्याने हा प्रकार घडलेला आहे. दोघांना शुक्रवारी तहसील कार्यालयात बोलवले असून रेकॉर्ड परत मिळेल.’’ अंजली मरोड, तहसीलदार, उत्तर सोलापूर