आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंग जागा हडप; पालिका देणार नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष केंद्रित केलेले महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पार्किंगची जागा गायब करणार्‍यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सन 2007 ते 2009 दरम्यान बांधकाम परवानगी दिलेल्या अनेक अपार्टमेंटस् आणि व्यवसायिक काम्प्लेक्सनी पार्किंगच्या जागांचा अन्य कारणांसाठी वापर सुरू केला आहे. सुरुवातीला शहराच्या मध्यवर्ती भागातील नियम मोडणार्‍या इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे. व्यापारी, बिल्डर्स, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या 159 इमारतींची यादी बांधकाम परवाना विभागाने तयार केली आहे. त्यापैकी 46 जणांना बुधवारी नोटिसा काढण्यात आल्या. त्या गुरुवारी बजावण्यात येणार आहे.

यांना मिळणार गुरुवारी नोटीस
अपार्टमेंट आणि व्यवसायिक कॉम्प्लेक्समध्ये पार्किंग जागेवर अनधिकृत बांधकाम करून दुकाने, कार्यालये, हॉस्पिटल, लॅबोरेटरी, हॉटेल, परमीट रूम बांधण्यात आले आहेत. त्यानुसार नोटीस काढण्यात येणार आहे.

सहा अभियंत्यांना देण्यात आले आदेश
शहरातील इमारतींच्या पार्किंग जागेचा अन्य कारणांसाठी वापर होत असल्याने त्या जागांची तपासणी करून तत्काळ नोटीस द्यावी, असा आदेश सहा अभियंत्यांना बुधवारी देण्यात आला.

या ठिकाणी बांधले
स्टील पार्किंग, बंदिस्त पार्किंग, तळघर पार्किंग, अपार्टमेंटमधील पार्किंग या प्रकारच्या जागांवर बांधकाम केल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले.

तपासणी पत्रक
पार्किंग जागेचा चुकीचा वापर करत असल्यास त्या इमारतीची पाडकामाची नोटीस काढण्यात येणार असल्याचे बांधकाम परवाना विभागाचे दीपक भादुले यांनी दिली.