आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Partiality In Distributing In Fund, South Solapur Get Most Benefit

निधी जातोय दक्षिणकडे; शहर उत्तरला मात्र ठेंगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सत्ताधारी लोकप्रतिनिधी मतदारसंघाचे गणित ध्यानात ठेवून केवळ आपल्या मतदार संघासाठीच निधी खेचून घेत आहेत. याचवेळी विरोधी पक्षाचा लोकप्रतिनिधी असलेल्या मतदार संघासाठी मात्र निधी मिळण्यात विलंब होत आहे. यामुळे शहराचा असमतोल विकास होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कॉंग्रेसचे आमदार दिलीप माने यांच्या मतदारसंघात (सोलापूर दक्षिण) विकास कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत, तर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात (शहर उत्तर) विकास कामांसाठी निधी मंजूर होत नसल्याचे पुढे आले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, शहर उत्तरवर निधीच्या बाबतीत अन्याय होत असल्याचे सत्ताधारी पक्षातील सभागृह नेते महेश कोठे यांनी मान्य केले.

आमदार माने दिवाबत्ती आणि नगरोत्थान योजना यासह विविध कामांसाठी महापालिकेचा निधी शहर दक्षिणसाठी द्यावा यासाठी दबावाचे राजकारण करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. विकासकामांच्या बाबतीत विरोधी पक्षाला डावलण्यात येत असल्याने शहराचा समतोल विकास होणार कसा, असा प्रश्न आमदार देशमुख यांनी उपस्थित केला. समतोल विकास व्हावा यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा र्शी. देशमुख यांनी दिला. शहर उत्तरमध्ये मात्र शासनाकडून निधी येताना दिसत नाही. दोन कोटींचा निधी मिळावा म्हणून आमदार देशमुख यांनी गेल्यावर्षी महापालिकेस पत्र दिले. मात्र निधी मिळाला नाही. राज्य शासनाकडून निधी नसल्याचे चित्र आहे.

समान निधी दिला जातो
निधीचे वाटप समान केले जाते. महापालिकेकडून निधी देताना मतदारसंघ पाहिला जात नाही. आमदार देशमुख यांच्या मतदार संघात कामे सुरू आहेत. शहराचा समतोल विकास सुरू आहे. राजकारण नको. प्रणिती शिंदे, आमदार, शहर मध्य

वजन वापरून निधी आणतो
आम्ही शासनापुढे वजन वापरून निधी आणतो आणि विकास करतो. महापालिकेचा निधी नेत नाही. दुसर्‍या मतदारसंघात निधी देण्यासाठी आम्ही मनपाला अडवत नाही. हद्दवाढ भागाकडून जास्त कर वसूल गेला जात होता, पण त्यांना सुविधा दिल्या नाही. तो भाग विकासापासून वंचित राहिला. त्यामुळे आम्ही विकास सुरू केला. दिलीप माने, आमदार, शहर दक्षिण

सत्ताधारी निधी नेतात
सत्ताधारी पक्षातील आमदार आपल्या मतदारसंघात निधी नेतात. त्यांना शहरातील नागरिकांशी देणे-घेणे नाही. त्यामुळे समतोल विकास होत नाही. आयुक्त गुडेवार यांनी लक्ष घालून समान निधी देण्याचा प्रयत्न करावा, यासाठी आयुक्तांना भेटणार आहे. नगरसेवक विकास निधी देतानाही पक्षपातळीवर राजकारण केले जात आहे. विजयकुमार देशमुख, आमदार, शहर उत्तर

हद्दवाढ भागात गेलेला निधी
जिल्हा वार्षिक योजनेत समाविष्ट असलेले सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत हद्दवाढ भागात 20 ठिकाणी पाइपलाइन टाकण्यासाठी दोन कोटी एक लाख 46 हजार 753 रुपये खर्च येणार आहे. त्यात महापालिकेचा 50 टक्के आणि शासनाचे 50 टक्के हिस्सा असणार आहे. मनपाकडून दिवाबत्तीसाठी एक कोटी निधी देण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधीसाठी आठ कोटी, जानकी नगर बागेसाठी एक कोटी देण्यात येत आहे. एकूण विविध विकास कामांसाठी शहर दक्षिणला झुकते माप दिल्याचे दिसत आहे. एमएसआरडीसीच्या रस्त्यांसाठी निधी प्रस्तावित आहे.

निधी देताना अन्याय होतो
शहरात निधी देताना शहर उत्तरबाबत अन्याय होतोय हे मान्य आहे. आमदार राहिलो असतो तर विकास केला असता. शहर दक्षिणमध्ये दोन कोटींचा विषय सभागृहापुढे आहे, पण त्याबाबत पार्टी मिटिंगमध्ये निर्णय घेऊ. महेश कोठे, मनपा विरोधीपक्ष नेता