आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त नगरसेवकांना पक्षाध्यक्षांकडून अभय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-कर्तव्यदक्ष आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याशी सत्ताधारी नगरसेवकांची अरेरावी आणि उपअभियंता विजय जोशी यांना मारहाण झाल्याच्या घटनेने शहर क्षुब्ध आहे. यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची प्रतिमा मलीन झाली. रविवारी शहरात हाच विषय सर्वत्र चर्चेला होता. दरम्यान, कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत दोन्ही पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवकांना पाठीशी घालत आहेत. दुसरीकडे गुडेवारांचे काम चांगले आहे, अशी मखलाशीही करण्यात आली.

अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरून काहींनी जोशी यांना मारहाण केली. त्यानंतर आयुक्‍त गुडेवार यांच्या कक्षात काँग्रेसचे चेतन नरोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील नेते दिलीप कोल्हे यांनी थेट दमबाजीची भाषा केली. गुडेवारांशी एकेरी बोलत अरेरावी केली. सीसीटीव्हीच्या फितीवरून हे स्पष्ट झाले. तसेच ते महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे राजकीय पक्षांसह सोलापूर शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे.

महापालिका आयुक्तांचा बंदोबस्त वाढणार?
सोलापूर २ महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनात शनिवारी हमरी-तुमरीची घटना घडली. या पार्श्वभूमीवर त्यांचा पोलिस बंदोबस्त वाढवणार का? असा प्रश्न समोर आला आहे.
श्री. गुडेवार यांना सध्या बंदूकधारी दोन पोलिस बंदोबस्तासाठी नेमले आहेत. आणखी वाढीव बंदोबस्ताचा पोलिसांकडे प्रस्ताव नाही. वाढीव पोलिस पाहिजे असल्यास गृहविभागाकडे माहिती द्यावी लागते, असा नियम आहे. त्यानंतरच वाढीव बंदोबस्ताचा निर्णय घेतला जातो. पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्याशी संवाद साधला असता, सध्या दोन पोलिस नेमले आहेत. वाढीव पोलिस नेमण्यासाठी माहिती व सूचना आल्यास त्यावर निर्णय
घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

आयुक्त आम्हाला लक्ष्य करत आहेत : भोसले
आयुक्त चंद्रकांत गुडेवार काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्यांच्या कामाला आमचा पाठिंबा आहे. परंतु ते काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसच्या सदस्यांनाच लक्ष्य करत आहेत, असा उलट आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. ते पुढे म्हणाले की, इतर पक्षाच्या सदस्यांच्या प्रभागात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांच्याच प्रभागात अतिक्रमण हटाव कारवाई केली जात आहे. त्यांनी असा पक्षपात करू नये. चेतन नरोटे हे त्यांना काय बोलले हे मी सोलापुरात आल्यावर क्लिप पाहूनच ते योग्य की अयोग्य यावर बोलेन. त्या प्रकरणावरून त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच नगरसेवक आणि अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. त्यासाठी आपण कसे वागावे, हे या दोघांनी ठरवावे.