आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passengers Unsecur At Railway Station; Four Days Three Incident

रेल्वे स्थानकावरच प्रवासी असुरक्षित ; चार दिवसांत चोरीच्या तीन घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकावर गेल्या चार दिवसांपासून चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. एकाच आठवड्यात चोरांनी फलाटावर थांबलेल्या रेल्वेच्या डब्यात घुसून महिलांच्या दागिन्यांची चोरी केली. प्रवाशांचा विशेषत: महिलांचा प्रवास असुरक्षित बनला आहे.

रात्रीच्या वेळी धावणा-या 24 गाड्यांना रेल्वे प्रशासनाने संरक्षण दिले आहे. गाड्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे पोलिस व लोहमार्ग पोलिस यांची आहे. रेल्वे पोलिस व लोहमार्ग पोलिस यांचे कार्यालय फलाटापासून हाकेच्या अंतरावर आहे. असे असताना वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. सोमवारी मुंबई -हैदराबाद या गाडीतील महिला प्रवाशाचे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले. मंगळवारी कन्याकुमारी-मुंबई गाडीतील एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरण्यात आली. अशीच घटना लागलीच दुस-या दिवशी बुधवारी घडली. रात्री आठच्या सुमारास नागरकोईल-मुंबई गाडी फलाट क्रमांक तीन वर असताना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे
दागिने पळविले.

अनधिकृत विक्रेत्यांच्या संख्येत झाली वाढ
रेल्वे स्थानकावर गेल्या काही महिन्यापासून अनधिकृत विक्रेत्यांची संख्या वाढलेली आहे. पूर्वी 40-50 असणारी संख्या आता 200 वर गेली आहे. चोरीच्या घटनांमध्ये काही अनधिकृत विक्रेत्यांचा सहभाग असल्याचा संशय रेल्वे पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्या दिशेने त्यांचा तपास सुरू आहे.तसेच मधल्या काळात या अनधिकृत विक्रेत्यांची दादागिरीही वाढली आहे. येथील अधिकृत विक्रेत्यांना यांच्याकडून त्रास दिला जातो.


चोरांचा बंदोबस्त करा
सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापक ए. के. प्रसाद यांनी चोरीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रेल्वे पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. तसेच लवकरात लवकर अशा चोरांचा बंदोबस्त करा, असा आदेशही रेल्वे पोलिसांना दिला आहे.

पोलिसांना दिले पत्र
स्थानकावर वारंवार होणा-या चोरीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलिसांना व लोहमार्ग पोलिसांना पत्र दिले आहे. चोरीच्या घटना थांबाव्यात म्हणून लवकरात लवकर मोहीम सुरू करण्याचे आदेश रेल्वे पोलिसांना देण्यात आलेले आहे.’’
सुशील गायकवाड, जनसंपर्क अधिकारी