आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकाराला धक्का - निम्म्याहून अधिक पतसंस्थांना लागणार टाळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - सहकारातून समृध्दी साधण्यासाठी उदयाला आलेले सहकार क्षेत्र गिळंकृत केले जात आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या सहकारी संस्था गैरकारभारामुळे तोट्यात आल्या आहेत. यामध्ये पतसंस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. जिल्ह्यातील 376 पैकी सुमारे 196 पतसंस्था अवसायनात काढण्यात आल्या असून, त्यापैकी 5 पतसंस्थेच्या पदाधिका -यांवर गैरकारभारामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोटावर मोजण्याइतक्या संस्था वगळता जिल्ह्यातील साखर कारखाने, सोसायट्या, जिल्हा सहकारी बँक डबघाईला आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात 173 नागरी, 187 ग्रामीण आणि 164 कर्मचारी अशा एकूण 524 सहकारी पतसंस्था आहेत. त्यापैकी 376 पतसंस्था सुरू होत्या. त्यातील 196 संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. सध्या केवळ 180 पतसंस्था सुरू आहेत. अवसायनात काढलेल्या या पतसंस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पतसंस्थांचे लेखापरिक्षण करण्यात येणार आहे. त्यात गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपासून नवीन पतसंस्थांना परवाने बंद झाल्यामुळे आता मल्टिस्टेट (बहुराज्य नागरी बँक) बँका सुरू झाल्या आहेत.
तीन पतसंस्थेच्या संचालकांना अटक - गैरव्यवहारामुळे पाचपैकी 3 पतसंस्थेच्या संचालकांना अटक करण्यात आली आहे. 2007 ते 2008 या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये कै. भाग्यश्री पाटील ग्रामीण बिगरशेती पतसंस्था म. लोहारा, ता. परंडा, अहिल्यादेवी नागरी सहकारी पतसंस्था परंडा, कै. भाग्यश्री पाटील जिल्हा नागरी पतसंस्था म. उस्मानाबाद मु. परंडा, श्रमकैवारी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था तुरोरी, ता. उमरगा, कै. संजय सोलंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था बलसूर, ता.उमरगा या पाच पतसंस्थेचा समावेश आहे. या पतसंस्थेत 79 लाख 20 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.
तेरणा संकटात - मराठवाड्यातला पहिला सहकारी साखर कारखाना असलेला तेरणा यावर्षी अधिकच चर्चेत आला आहे. उसाची बिले, कामगारांचे वेतन, जिल्हा बँकेचे थकीत कर्ज यामुळे शेतक -यांसह कामगार आणि जिल्हा बँकेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ऊस उत्पादकांच्या चकरा सुरू झाल्या आहेत. तर कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. परवाना मिळविण्यासाठी धडपडणारी जिल्हा बँक कारखान्याच्या जमिनीची विक्री करण्याच्या तयारीत आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असले तरी आर्थिक संकटात होरपळणा -यांसाठी मूळ मुद्दा महत्वाचा आहे. वाशी तालुक्यातील नरसिंह सहकारी साखर कारखान्याने उसाची बिले न दिल्यामुळे शेतकरी दोन वर्षांपासून आंदोलन करीत आहेत.
विरोध मावळला - जिल्ह्यात विरोधी पक्षाचा आवाज क्षीण झाला आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी वेगवेगळ्या संस्थांमध्ये गळ्यात गळे घालून सत्ता गाजवत आहेत. रोखे गैरव्यवहारानंतर कात टाकण्याच्या स्थितीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुन्हा एकदा घोटाळ्यांची कीड लागली आहे.सत्ताधा -यांनी सोयीप्रमाणे कर्ज वाटप केल्यामुळे आणि या कर्जाची परतफेड होत नसल्याने ग्राहकांवर संकट कोसळले आहे. त्यामुळे हक्काचे पैसे मिळणे अवघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चलन तुटवडा निर्माण झाल्याने कर्मचारी, शेतकरी, निराधारांना पैसे मिळणे अवघड झाले असून, राजकारण्यांना त्याचे सोयरसुतक दिसत नाही. राजकारण्यांनी ताब्यात घेतलेल्या संस्था नेमक्या कुणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा बँकेच्या 102 शाखा अडचणीत - उस्मानाबाद जिल्ह्यात सहकारी बँका राजकारण्यांचे कुरण बनल्या आहेत. सोयीप्रमाणे कर्ज वाटप करून स्वहित जोपासण्याच्या संचालकांच्या भानगडीमुळे जिल्हा बँकेचे खातेदार अडचणीत सापडले आहेत. जिल्हा बँकेच्या 102 शाखा असून, या शाखा अडचणीत आल्या आहेत. बँकेकडे 680 कोटींच्या ठेवी आहेत. मात्र, भ्रष्टाचारामुळे ठेवी काढण्यासाठी शाखांमध्ये ग्राहक गर्दी करीत आहेत.