आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिष्कृत जगण्याला भिकेचाच आधार; डोक्यावर छप्पर आणि पोटाला भाकरीचीही सोय होईना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा क्रीडा संकुलच्या मागील बाजूस, क्रमांक दोन एसटी बसस्थानकाच्या शेजारी थोड्याशा आतील बाजूस जवळपास 12 एकर जागेवर ही वसाहत आहे. वसाहत नावालाच. सध्या येथे 73 रुग्णांसह त्यांचे नातेवाईक असे एकूण 125 जण आपल्या फाटक्या आयुष्याला ठिगळे जोडत कसेबसे जगताहेत. पोट भरण्याच्या लढाईत त्यांना दररोज पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यांना मदतीची, आरोग्य सुविधा, अन्न, कपड्यांची गरज आहे. डोक्यावर पत्र्याचे का असेना एका छपराची गरज आहे. समाजाकडून त्यांना भक्कम मदत मिळण्याची अपेक्षा फोलच ठरली आहे.

आश्वासनांचे पीक करपले
कधी मोठे नेते येतात, काय हवे ते विचारतात.. पुन्हा फिरकत नाहीत. कधी समाजात काही नाव कमावलेले येतात. काहीबाही देतात, त्यावर गुजराण होते. पाठ फिरताच पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’. ठोस उपाययोजना होतच नाहीत. पक्की घरे बांधण्याच्या आश्वासनांचे पीकही आता करपले आहे. आता गेल्या चार-पाच महिन्यांपासून उपचारासाठी कोणी डॉक्टर नाहीत. महिन्याला काही प्रमाणात महापालिकेकडून 73 जणांना धान्य, जळण, मिळते, एवढीच काय ती समाधानाची बाब.

वीज बिल 55 हजार
घरात अन्न नसताना, वीज वापराचे बिल मात्र भरमसाठ येते. दोन महिन्यांपूर्वी तर 55 हजार रुपये वीज बिल आले. वीज कंपनीने वसाहतीची वीज तोडली होती. महापालिकेने निम्मी रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा सुरू झाला.

घरकुले नियोजितच
कुष्ठरुग्णांसाठी सुमारे साठ घरकुले बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. टेंडर निघाले आहे. मात्र, तांत्रिक कारणाने टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

वसाहतीतील समस्या..
>कचरा, सांडपाण्याची दुर्गंधी
>संपूर्ण वसाहतीला बकाल स्वरूप
>रुग्णालय चार महिन्यांपासून बंद
>स्वयंपाकघरात कुत्र्यांचा वावर
>आरोग्य सुविधा नसल्याने परवड

महापालिकेला मुहूर्त सापडेना..
पूर्वी या रुग्णांसाठी डॉ. अरुण काळे कार्यरत होते. गेल्या चार महिन्यांपासून ते रजेवर असल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. पर्यायी व्यवस्था करण्यात महापालिकेला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. विविध वैद्यकीय जागा रिक्त असल्याच्या पार्श्वभूमीवर त्वचारोग तज्ज्ञांची वानवा असल्याने बिकट परिस्थिती उद्भवली आहे.

या वसाहतीत गळक्या घरांच्या आडोशाने कसेबसे राहतोय. महिन्याला काही प्रमाणात महापालिकेचे रेशन-पाणी मिळते. सिव्हिलमध्ये उपचार घेता येतात, पण डोक्यावर छप्पर नाही. गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा करतोय पण साध्य काहीच होत नाही. तक्रार नाही, पण ही मागणी मान्य करावी.
-किसन जोशी, रुग्ण

पडक्या घरात, छप्पर नसलेल्या भिंतींचा आधार घेत राहतोय. आमच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे? घर बांधून मिळावे, औषधोपचार मिळावेत एवढीच अपेक्षा. दहा वर्षांपासून ही मागणी मांडली जातेय, पण नशिबातच नाही, तर कुठून मिळणार? लवकरात लवकर घरे मिळावीत.
-व्यंकट यादगिरी, रुग्ण

प्रत्येक रुग्णाला 2200 रुपयांचे रेशन-पाणी महापालिकेकडून दर महिन्याला अथवा दोन महिन्याला मिळते. पण जगण्यासाठी केवळ इतकेच पुरसे नाही. रोग बरा झालाय, हातापायाची बोटे गळालीत. पण रोगाच्या खुणा आहेतच की, त्या कशा बुजणार? आमच्या मोकळ्या जागेवरही अतिक्रमण होत आहे. - -व्यंकटेश कुलकर्णी, रुग्ण

प्रत्येक रुग्णाला 2200 रुपयांचे रेशन-पाणी महापालिकेकडून दर महिन्याला अथवा दोन महिन्याला मिळते. पण जगण्यासाठी केवळ इतकेच पुरसे नाही. रोग बरा झालाय, हातापायाची बोटे गळालीत. पण रोगाच्या खुणा आहेतच की, त्या कशा बुजणार? आमच्या मोकळ्या जागेवरही अतिक्रमण होत आहे. -व्यंकटेश कुलकर्णी, रुग्ण

उंदीर, घुशींचा खूप त्रास होतोय येथे. मोकळ्या जागेवर काटेरी झाडे उगवलीत, त्याच्या आर्शयाने उंदरांची बिळे आहेत. आजारपणामुळे शरीराला बधिरत्व आलेले असते. उंदीर केव्हा चावून जातात हे समजतही नाही. मग जखमा चिघळतात, त्या वर्षानुवष्रे वागवतोय. तसेच खराब वागणूकही मिळते.
- धोंडिबा होरते, रुग्ण

कुमठा नाका, राजस्व नगर येथे राखीव शेतजमीन होती. तेथे पूर्वी पिके डोलायची. आता अतिक्रमणे वाढली, शेत पडिक झाले. उत्पन्नाचे साधनच नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागणे हाच पर्याय उरला आहे. कपडे, औषधे, अंथरुण, पांघरुण तर नशिबीच नाही. डोक्यावर छप्पर केव्हा येणार ? - -दिगंबर साखरे, रुग्ण

वैद्यकीय युनिटसाठी प्रस्ताव
कुष्ठरुग्णांसाठी खास वैद्यकीय युनिट असावे, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. डॉ. काळे यांनी सेवा थांबविल्यानंतर आठवड्यातून एकदा व्हिजिटिंग तत्वावर नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यांनीही काम थांबविले. प्रस्ताव लवकरच मंजूर होईल. डॉ. जयंती आडके, आरोग्य अधिकारी, मनपा

सुविधा देण्यासाठी पाठपुरावा
कुष्ठरुग्णांसाठी स्कीन स्पेशलिस्ट डॉक्टर पाहिजेत. यापूर्वी डॉ. काळे कार्यरत होते, मात्र ते काही कारणांमुळे दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत. दुसरीकडे वैद्यकीय जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. या रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सी. एस. र्शीमंगले, व्यवस्थापक, कुष्ठरुग्ण वसाहत