सोलापूर - उत्पादकीय दोष असलेल्या टाटा इंडिगोप्रकरणी वासंती सूर्यवंशी यांना व्याजासह कारची किंमत देण्याचा आदेश ग्राहक मंचचे अध्यक्ष मिलिंद पवार, सदस्य ओंकारसिंह पाटील यांनी वितरकास दिला.
जानेवारी २००९ रोजी सूर्यवंशी यांनी हुंडेकरी मोटार्स (अहमदनगर) यांच्याकडून चार लाख ८७ हजार रुपये किमतीची कार खरेदी केली होती. गाडी चालविताना उजव्या बाजूला गाडी ओढत होती. वितरकांकडेही याबाबत वारंवार त्यांनी तक्रार केली. व्हील, अलाईमेंट करून दिले, पण दोष काही दूर झाला नाही. एका खासगी मेकॅनिक व्यक्तीकडून कारची तपासणी करून घेतल्यानंतर त्यात उत्पादकीय दोष असल्याचे निष्पन्न झाले.
सूर्यवंशी यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. ३१ ऑक्टोबर २००९ रोजी टाटा मोटार्स हुंडेकरी मोटार्स यांना नवीन कार बदलून देण्याचे आदेश झाले होते. त्यावर टाटा मोटार्सने राज्य आयोग, मुंबई यांच्याकडे अपील केले. पुरावा देण्याची संधी मिळाली नाही म्हणून फेरचौकशीला अर्ज परत पाठविले.
सुधीर चव्हाण या खासगी मेकॅनिकचा अहवाल दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. त्यावर न्यायालयाने श्रीमती सूर्यवंशी यांना कारची मूळ किंमत व्याजासह देण्याचे आदेश दिले. अर्जदारातर्फे अॅड. एस. एस. कालेकर, अॅड. शिवानी कालेकर, टाटा मोटार्सतर्फे अॅड. शकील नदाफ यांनी काम पाहिले.