आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Of Solapur Preferring Europe And Eastern Countries For Holidays

सोलापूरकरांना भुरळ युरोप नि पूर्वेकडील देशांची!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जागतिक पर्यटन दिन शुक्रवारी आहे. त्यानिमित्ताने सोलापुरातून आंतरराष्ट्रीय पर्यटनास गेलेल्यांशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. परदेशवारी करणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. तसेच त्यांचे प्रमाणही वाढत आहेत. काहींनी अनेक वेळा परदेश वार्‍या केल्याचे सांगितले. त्यातही युरोपीय देश आणि पूर्वेकडील देशांकडे कल असल्याचे पुढे आले. पूर्वकडील देशांमध्ये प्रामुख्याने सिंगापूर, मलेशिया, थायलंड आदी देशांचा समावेश आहे. परदेशातील आगत्य, पाहुणचार, स्वच्छता आणि शिस्त यांचा मोठा प्रभाव पडल्याचे पर्यटकांनी सांगितले. तशी व्यवस्था आपल्या देशात परदेशी पर्यटकांना मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


प्रेमळ माणसे न्यूयॉर्कची
स्वाती देखणे (व्यवस्थापक, देखणे लॅबोरेटरी) : दोन मुले आणि आईला घेऊन न्यूयॉर्कला गेले होते. पर्यटनासाठी आईला घेऊन आलेल्या या भारतीय संस्कृतीबद्दलही तिथल्या काहींना कौतुक वाटले. ओळख नसतानाही हाय हॅलो करणारी मंडळी खरेच प्रेमळ होती. तिथल्या डिस्नेलँडमध्ये मुलांनी खूपच मौजमजा केली. विमानतळ असो की हॉटेल तेथील आदरतिथ्यच वेगळे असते. न्यूयॉर्क जरूर पाहून यावे.

अन् विमानच चुकले
प्रवीण भुतडा (व्यापारी) : मलेशियाला गेलो होतो. तेथील निसर्गरम्य ठिकाणे, हॉटेल, मॉल्स पाहता पाहता दिवस गेले. यातच वेळेचे भान राहिले नाही. विमानतळावर पोहोचलो त्यावेळी विमान निघून गेले होते. थोडीशी भीतीच वाटली. घडलेलाल प्रकार तिथल्या अधिकार्‍यांना कथन केला. त्यांनी काहीही न बोलता दंडाची पावती दिली आणि दुसर्‍या विमानाचे तिकीटही दिले.



युरोपात पर्यटनास पोषक वातावरण
संध्या बावसकर (गृहिणी) : परदेशात पर्यटकांना पाहण्यासाठी खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत. भारतातही प्रेक्षणीय स्थळे आहेत. नुकताच युरोपीय देश आणि सिंगापूर, थायलंड, मलेशिया या देशांचा दौरा केला. परदेशात पर्यटन वाढीसाठी अत्यंत पोषक असे वातावरण आहे. एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर मुबलक साधने असतात. त्यातुलनेने भारतात संख्या कमी आढळते. भारतीय पर्यटन व्यवस्था चांगली करण्यासाठी अथवा मजबूत करण्यासाठी वाहतुकीची साधने मुबलक असणे गरजेचे बनले आहे. आपल्याकडे धार्मिक पर्यटनांसाठी येणारे पर्यटक खूप असतात.

पर्यटन म्हणून युरोप सुंदर
सुहास जोशी (वरिष्ठ व्यवस्थापक, विडॉल कंपनी) : पर्यटन म्हणून युरोपीय सर्व देश, दुबई, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया आदी सर्व देश उत्तम आहेत. या सर्व देशांतील अनुभव खूप चांगले आहेत. युरोपचे 16 दौरे झाले आहेत. एकाही दौर्‍यात मला वाईट अनुभव मिळाला नाही. बाहेरील सर्व देशांत वेळेचे महत्त्व, नियोजन, शिस्तबध्द कार्य, प्रामाणिकता, फसवेगिरी, लूट असा प्रकार कुठेही आढळून आला नाही. बाजारपेठेत काही ठिकाणी दर कमी-जास्त होत असतील तर तेथील गाईड अगोदरच त्या बाजारपेठेची माहिती देतात. परंतु त्या बाजारपेठेतही फसवणूक होत नाही. वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. येथे कधी वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून आले नाही. येथील स्वच्छता तर अप्रतिम आहे. पाण्याची उत्तमपणे बचत केली जाते. काही ठिकाणी तर बाथरुम मध्येही कारपेट आहेत. एकंदरीत युरोपची व्यवस्था चांगली आहे.

नियोजनपूर्वक प्रवासाने अधिक आनंद
सुधीर खरटमल (संचालक, सुधीर गॅस एजन्सी) : मी आणि पत्नी हे युरोपला गेलो होतो. अखंड आयुष्यात कष्टात गेलेल्या आमच्या त्या क्षणांना विसावा देण्याचे काम या सहलीने केले. पत्नी स्मिताने याचे नियोजन केले. नियोजनाने एवढा आनंद मिळतो याचे ज्ञान यानिमित्ताने मिळाले. शिकताही खूप आले. परदेशात आपल्या देशाच्या मानाने कायदा व नियम सुव्यवस्था याला खूप महत्त्व आहे. त्यांच्या या गुणांचे नवल वाटले. कायदा सुव्यवस्था आणि निर्सगावर प्रेम करण्याच वृत्ती यावर ते लोक खूप प्रेम करतात. त्या ठिकाणचे निसर्गही अनोखे होते. कुठे बर्फाच्या सरी तर कुठे बोचरी थंडी याने आनंद मिळाला.

पूर्वेच्या देशात चांगली वागणूक
जयर्शी माने (निवृत्त परिचारिका, सिव्हिल हॉस्पिटल) : पर्यटन हा माझा आवडता छंद. वर्षातून एकदा तरी बाहेर देशात जाते. तिथली संस्कृती, कला आदी गोष्टी पाहून येते. नुकतीच थायलंड, सिंगापूर, मलेशिया आदी पूर्वेकडील देशांत जाऊन आले. येत्या नोव्हेंबरमध्ये चीन व आफ्रिका येथील देशांत जाण्याचे नियोजन आहे. परदेशात आपल्या तुलनेत माणुसकी कमी आहे. मात्र, तिथे परदेशी पर्यटकांबाबत कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. आपल्याकडे परदेशी पर्यटकांबरोबर कधी कधी चुकीची वागणूक दिली जाते. या गोष्टी भारतीय संस्कृतीला तर काळे फासण्यासारख्या आहेत. यामुळे पर्यटन विश्वात चुकीचा संदेश जातो. परदेशातील पर्यटन व्यवस्था आपल्यापेक्षा मजबूत आहे. अन्य देशांत पर्यटकांना चांगली वागणूक मिळते. तशी ती भारतात येणार्‍या पर्यटकांना मिळावी.

मंतरेलेल दिवस होते
शब्बीर सय्यद (निवृत्त व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक), नाहीद सय्यद (पत्नी) : परदेश प्रवासातील अनेक दिवस आमच्यासाठी मंतरलेले दिवस होते. युरोप, सिंगापूर येथे भेटी दिल्या. युरोपच्या संस्कृतीचे काही गुण आवडले तर काही आवडले नाहीत. स्वच्छतेचे बंधन खूपच छान आहे. प्रत्येक नागरिक हा आपल्या देशाच्या स्वच्छतेकडे पर्यायाने विकासाकडे लक्ष देतो. पत्नी नाहीद ही तिथल्या प्रवासादरम्यान एक वेगळाच आनंद लुटत होती. आमच्या जोडीचा आयुष्याच्या उतार वयात जीवनाचा आनंद व्दिगुणीत करण्याचे र्शेय या आनंदी पर्यटानाच्या क्षणांना जातो.

सिडनीतील अविस्मरणीय सायंकाळ
योगेश राडिया (कापडाचे व्यापारी) : ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी शहरात दीड महिना राहण्याचा योग आला. डार्लिंग हार्बर, ओपरा हाऊस ही पर्यटनस्थळे लाखो पर्यटकांना आकर्षित करतात. आल्हाददायक वातावरण, प्रेमळ व प्रामाणिक माणसं, पोलिसांची अनोखी शिस्त सर्व जवळून पाहाता आली. सिडनीतील नागरिकांना भारतीयांविषयी अमाप प्रेम आहे. 31 डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 20 मिनिटांचा सोहळा ओपरा हाऊसमध्ये आयोजित केला जातो. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. पण या गर्दीतही शिस्तीला खूप मोठे महत्त्व आहे. थोडासा धक्का लागला तरी सॉरी म्हणण्याची पद्धत पहिल्यांदाच अनुभवण्यास मिळाली. या सोहळ्याचा किमान एकदा तरी अनुभव घ्यावा.

परदेशातील रस्ते उत्तम
महावीर शास्त्री (जैन समाजाचे अभ्यासक) : कॅनडा आणि आस्ट्रेलियात गेलो होतो. नायगरा शहरात जाण्याचा योग आला. तेथे धबधबा आहे. जगातला सर्वात आणि उंच धबधबा आहे. तेथील रस्त्याची व्यवस्था उत्तम आहे. तेथे सुविधा आहे. तेथे पाहण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. धोकादायक असे काही दिसून येत नाही. परदेशातील नागरिकांनी काय पाहिजे ते तेथे दिले जाते. महत्त्वाच्या स्थळांची माहिती दिली जाते. सुरक्षेचे सर्व उपाय आहेत.

अवर्णनीय असा थेम्सचा आल्हाददायक परिसर
डॉ. नवनीत तोष्णीवाल (नेत्रतज्ज्ञ) : युरोपातील लंडन सर्वाधिक आवडते शहर. शहरातील उंचच उंच इमारती आणि भुरभुर पडणार्‍या पावसात मनसोक्त फिरणे हे सर्व अवर्णनीयच. यामध्ये सर्वाधिक आवडलेले ठिकाण म्हणजे थेम्स नदीचा परिसर. ही नदी लंडन शहराच्या मधून वाहते. नदीच्या दोन्ही काठाला पर्यटकांना मनसोक्त आनंद घेण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. नदीवर अनेक ठिकाणी पूल बांधण्यात आले आहेत. यामध्ये लंडनचा टॉवरब्रीज हा अद्भुतच आहे. नदीतून जहाजवाहतूक होते. त्यांना जाता यावे यासाठी हा अध्र्या तासाठी पूल आपोआप उचलला जातो. याशिवाय ब्रिटिश संग्रहालय, ग्रंथालय पर्यटकांना आकर्षित करतात.