आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी अजरामर राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सध्या अनेकांना मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चिंता जाणवते. मात्र, जोपर्यंत महाराष्ट्रात खेडे आणि खेड्यातील माणूस आहे. जोपर्यंत वारकरी पंढरपूरला येत राहतील तोपर्यंत मराठी भाषा अजरामर असेल, असे गौरवोद्गार ज्येष्ठ कवी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी सोलापुरात काढले.

सोमवारी श्रमिक पत्रकार संघात र्शी. शिंदे यांचा वार्तालाप आयोजिण्यात आला होता. त्या निमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. मराठी भाषेबद्दल ते म्हणाले, की मराठी भाषा ही आपले वैभव आहे. मात्र, ज्या भाषांच्या तुलनेने मराठी पुस्तकांचे अनुवाद व्हायला हवे होते, त्या प्रमाणात मराठी भाषेतील पुस्तकांचे अनुवाद होत नाहीत. इंग्रजी भाषेचे मराठीवर आक्रमण होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अशी अनेक आक्रमणे झाली तरीही मराठीला कोणताही धोका नाही. त्यामुळे उगाच मराठीच्या अस्तिवाबद्दल चिंता करू नका. या वेळी मसापचे पद्माकर कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस राकेश कदम आदींसह संघाचे सदस्य, पत्रकार उपस्थित होते.

साहित्य संमेलने म्हणजे तीर्थक्षेत्र
जसे वारकर्‍यांसाठी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. तसे साहित्यिकांसाठी मराठी साहित्य संमेलन हे तीर्थक्षेत्र आहे. हा एक उत्सव आहे. संमेलन साधेपणाने साजरे व्हावे. अवाढव्य खर्च थांबायला हवे. साहित्यिकांनी संमेलनास उपस्थित राहताना आपला खर्च स्वत: करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

अभिव्यक्त होण्यासाठी लेखन
जर आपल्याला आपलं आयुष्य अभिव्यक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी लिहिता आलं पाहिजे. चांगले लिखाण करण्यासाठी त्यांना माणुसकीचं अधिष्ठान असायला हवं. लेखकाला, कवीला लिखाण करण्यासाठी सामाजिक चिंतन असायला हवं. कोणत्याही भाषेचा द्वेष करण्याची गरज नाही.