आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांकडून 24 टक्के दंड घेणार्‍या मनपाने ‘जाईजुई’चा दंड केला माफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी संबंधित जाई-जुई विचार मंच या संस्थेला शासनाच्या लेखापरीक्षण विभागाने केलेला दंड महापालिकेने परस्पर माफ केल्याचे पुढे आले आहे. शहरवासीयांना 24 टक्के दंड लावणारी महापालिका जाई-जुईवर मेहेरबान का झाली, याचा जाब विचारणार असल्याचे विरोधी पक्षांकडून सांगण्यात आले. सन 1991 ते 2001 पर्यंतचे जन्म आणि 1991 ते 2004 पर्यंतच्या मृत्यूच्या नोंदी संगणकावर करून देण्याच्या कामाचा मक्ता जाई-जुई विचार मंचला देण्यात आला होता. सदरचे काम वेळेत करून दिले नाही. मुदतीनंतर प्रतिदिन 250 रुपयांप्रमाणे 62 हजार 500 रुपये दंड आकारण्याचा आदेश शासनाच्या लेखापरीक्षण विभागाने दिला होता.

दंडाची रक्कम वसूल करावी अथवा महापालिका ठरवेल त्याप्रमाणे दंड वसूल करावा, असा आदेश असताना महापालिकेने दंड माफ केला. दंड माफ केल्याचा विषय शुक्रवारी होणार्‍या महापालिका स्थायी समितीसमोर माहितीस्तव ठेवण्यात आला आहे.
हा दंड कोणत्या नियमानुसार माफ केला. एकीकडे शहरातील नागरिकांना 24 टक्के दंड लावत असताना मंचला झालेला दंड कोणत्या नियमानुसार माफ केला, या गोष्टीचा जाब स्थायी समितीत विचारणार आहे. आनंद चंदनशिवे, स्थायी समिती सदस्य
महापालिका ड्रेनेज मक्तेदारांस कोट्यवधी रुपयांची दंडाची आकारणी करते तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या नावाने असलेल्या जाई-जुई मंचला दंड माफ करते. हे चुकीचे आहे. आम्ही स्थायीत याला विरोध करू. शिवानंद पाटील, स्थायी समिती सदस्य

मी आमदार झाल्यावर जाई-जुई विचार मंच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते काम आम्ही वेळेत केले. आम्हाला दंड झाला असेल तर त्याबाबत मनपाने नोटीस दिली नाही. आम्हाला काहीच कल्पना दिली नाही. ती मनपाची चूक आहे. मंचला दंड झाला असेल तर मनपाने तो माफ करू नये. आम्ही दंड भरू. प्रणिती शिंदे, संस्थापक, जाई - जुई