आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमच होतोय श्री सिद्धेश्वर महाराज गड्डा यात्रेचा आराखडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज गड्डा यात्रेत सहभागी यात्रेकरूंचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आरखडा तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला. यात्रेकरूंच्या आरोग्याची काळजी म्हणून धुळीच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी मॅट अंथरा, अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, सिद्धेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणे तत्काळ हटवा, असे आदेश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त कायदा सुव्यवस्था आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी विशेष बैठक झाली. यावेळी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह देवस्थान कमिटीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नंदीध्वज मिरवणूक मार्ग सुस्थितीत ठेवा. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी, होम मैदान परिसरात तात्पुरत्या स्वरूपात पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अक्षता सोहळ्याची गर्दी लक्षात घेता संरक्षित कठडे (बॅराकेड्स) स्क्रीनची पुरेशी व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले. ते ३१ जानेवारीपर्यंत पोलिस बंदोबस्त पुरवला जाईल, असे पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी सांगितले. वाहतूक नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्न औषध प्रशासन : यात्रा आवारातील हॉटेल्स, खाद्यपदार्थांची तपासणी करावी. पिण्याच्या शुध्द पाण्याची तपासणी करावी.

महावितरण: यात्रेतील स्टॉलची विजेची मागणी लक्षात घेऊन जादा जोडण्या कशा देता येईल, याचा आराखडा तयार करावा. त्यानुसार वीजपुरवठा करावा. त्याचा खर्च संबंधित ट्रस्टकडून वसूल करावा. बेकायदा असुरक्षित जोडण्या शोधण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करावीत.

जिल्हा परिषद : वैद्यकीय पथक नियुक्त, यात्रा परिसर निरोगी स्वच्छ राहील, भाविकांसाठी पाण्याची सोय करणे.

पोलिस प्रशासन : कायदा सुव्यवस्था सांभाळणे, वाहन पार्किंग वाहतूक मार्गात बदल, आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावणे.

आरटीओ: अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, भाविकांचा अंदाज घेऊन पुरेशा बस उपलब्ध करा.

जनावर बाजारसाठी देणार नाही जागा
रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसरातील पालिकेच्या जागेवर दरवर्षी जनावरांचा बाजार भरत असतो. यंदा त्या जागेचा वाद निर्माण झाल्याने महापालिका ती जागा बाजारसाठी देणार नाही, असे मनपाचे विधान सल्लागार अरुण सोनटक्के यांनी सांगितले.

अतिक्रमण काढणार
^सिद्धेश्वर मंदिरसमोरील अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यानुसार सोमवारपासून मोहीम हाती घेणार आहोत. मंदिरासमोरील बेकायदा दुकानांसह इतर अतिक्रमण काढण्याबाबत आढावा घेणार आहे. चंद्रकांतगुडेवार, आयुक्तमनपा
धुळीच्या प्रदूषणावर करा नेमके उपाय
यात्रेनिमित्त स्टॉल उभारताना जागेच्या क्षेत्रफळानुसार स्टॉलची संख्या निश्चित करा. मंिदर परिसरात धुळीचा त्रास होऊ नये यासाठी मॅटची व्यवस्था करा. शक्य तेथे पाणी फवारून धूळ नियंत्रणात आणा, असे आदेश आहेत. धुळीच्या धास्तीने यात्रा टाळणाऱ्यांची यामुळे सोय होणार आहे. तसेच दमा आदी श्वसन विकार असणाऱ्यांचा त्रासही कमी होण्यास मदत होईल.
२४ तास चालू असेल आपत्ती नियंत्रण कक्ष
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष २४ तास चालू असेल. कक्षात गतिमान संपर्काची साधने उपलब्ध असतील. सुस्थितीतील ध्वनिक्षेपण यंत्रणा असावी. संपूर्ण यात्राकाळात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. गड्डा यात्रेमध्ये स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव आणि मतदार नोंदणी आदी मोहिमांच्या प्रचार-प्रसाराचे स्टॉल उभारावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी मुंढे यांनी केली.
सोलापूर जुनापुणे नाक्याजवळील नियोजित १२ मीटर रस्त्यासाठी आरक्षित २०० मीटर जागेवरील अतिक्रमण मनपाने शुक्रवारी काढले. आता त्या ठिकाणी नव्याने रस्ता करण्यात येत आहे. यामुळे तेथे असलेल्या शिवयोगी सिद्धेश्वर स्थापित २९ व्या शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा मार्ग सुकर झाला आणि शिवाजी चौकातील वाहतुकीवरचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. सम्राट चौकाकडे जाण्यासाठी जुना पुणे नाक्यापासून १२ मीटर रुंदीचा पर्यायी रस्ता होता. त्या रस्त्यावर भंवरलाल राजोतिया यांचे अतिक्रमण होते. सिद्धेश्वर मंदिर समितीचे नंदकुमार मुस्तारे, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी शिवलिंगाची पूजा करण्यात आली. दोन जेसीबी, दोन डंपर, २० कर्मचाऱ्यांनी मिळून तीन तासात हा मार्ग खुला केला.