आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळात प्लास्टिक बुकेंना आला बहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दुष्काळामुळे निर्माण झालेली पाण्याची तीव्र टंचाई आणि वाढते तापमान यावर फूल आणि बुके विक्रेत्यांनी नवी शक्कल लढवली आहे. या काळात फुलांची आवक खूपच कमी असते. फुलांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत.

त्यातच दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान आणि वाढत्या तापमानात लवकर कोमेजणार्‍या फुलांमुळे सुगंधी फुलांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. यावर उपाय म्हणून हुबेहूब नैसर्गिक वाटावी अशी प्लास्टिकची फुले आणि बुके आता बाजारात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात लग्न, वाढदिवस आदी सोहळ्यातही हळूहळू प्लास्टिकचे बुके दिसताहेत.


ही फुले आकर्षक तर आहेतच; शिवाय कायम ताजीतवानी राहात असल्याने आता ग्राहकांनीही या पर्यायाला पसंती दिल्याचे चित्र शहरात दिसत आहे. वाजवी किमतीत या फुलांची परडी व बुके उपलब्ध होत आहेत.


येथून येतात फुले
मुंबई, सुरत आदी ठिकाणांहून ही कृत्रिम फुले आणि बुकेचे साहित्य आणले जाते. नैसर्गिक फुलांमध्येच या फुलांच्या परड्या सजवून ठेवल्याने त्या तत्काळ ओळखू येत नाहीत. शहरातील पार्क चौक, सात रस्ता चौक व बाजारपेठेत ही फुले विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


त्याच किमतीत योग्य पर्याय..
गुलाबाचे एक फूल पाच ते दहा रुपयांना मिळते. अन्य फुलेही याच किमतीला आहेत. बुके शंभर ते हजार रुपयांपर्यंत आहेत. शिवाय लांबच्या प्रवासात कोमेजण्याची शक्यता असल्याने अशा फुलांचा बुके चांगला पर्याय ठरत आहे. त्याच्या किमतीही नैसर्गिक फुले व बुकेप्रमाणेच आहेत.


प्लास्टिक फुलांची ही आहे खासीयत
कृत्रिम फुलांच्या बुकेत गुलाब, मोगरा, जरबेरा आदी कापडी फुले उपलब्ध आहेत; परंतु नैसर्गिक फुलांप्रमाणे यांना सुगंध नाही. यांचा रंग नैसर्गिक फुलांपेक्षा अधिक पटीने आकर्षक आहे.


याच फुलांना मागणी
गिर्‍हाईक कमी किमतीत चांगली वस्तू मिळायची अपेक्षा करत असते. उन्हामुळे कोणतीच फुले टिकत नाहीत. आम्हीही लग्नसजावट, इतर सजावट किंवा बुकेमध्ये या प्रकारच्या फुलांचा वापर करतो. ते दोघांनाही परवडणारे आहे. शिवाय याला मागणी वाढत आहे.’’ राजू बागवान, सना फ्लॉवर्स