आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो पॉलिथीन : सोलापूर मनपात येणार आता कागदी कप, महापौर आबुटे यांनी काढले फर्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्लास्टिककपमधून गरम चहा घेतल्याने कर्करोगसारखा दुर्धर आजार बळावत असेल तर असे कप महापालिका आवारातून हद्दपार झाले पाहिजेत, असे फर्मान महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी सोडले. स्वत:चे आरोग्य सांभाळण्यासाठी नागरिकांनी अशा कपला स्पष्टपणे नकार द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दिव्य मराठी ‘नो पॉलिथीन’ अभियानात प्लास्टिक कपचे दुष्परिणाम सांगण्यात आले. उकळता चहा प्लास्टिक कपमध्ये ओतल्यानंतर रासायनिक प्रक्रिया सुरू होते. त्यातून कर्करोगाला कारणीभूत असणारे रासायनिक घटक बाहेर पडतात. चहात मिसळले जातात. त्याच्या सेवनाने कर्करोग उद्भवू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दिव्य मराठीमध्ये या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही टपरीवाल्यांनी प्लास्टिक कप बंद करून कागदी कप सुरू केले. परंतु महापालिकेत प्लास्टिकचे कप वापरात असल्याची बाब महापौरांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने नगर सचिवांना सूचना केली, की यापुढे प्लास्टिक कपमधून चहा द्यायचे नाही. कागदी अथवा चिनी मातीचे कप यातून चहा द्यावा. सभागृहात त्याचाच वापर करावा. महापौरांच्या सूचनेचा अंमल महापालिकेत तातडीने सुरू झाला. त्यामुळे प्लास्टिक कप महापालिका हद्दीतून बाहेर पडले.

नागरिकांनी पुढे यावे

चांगल्या गोष्टीची सुरुवात नेहमी प्रथम नागरिकाकडूनच अपेक्षित असते. म्हणूनच महापालिका आवारातून प्लास्टिक कपला हद्दपार केले आहे. आता प्लास्टिकला शहराबाहेर घालवण्याची जबाबदारी नागरिकांची. प्लास्टिक कपमधून चहाच नाही, तर इतर कोणतेही पदार्थ घेतले नाहीत तर असे कपच दिसणार नाहीत. स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण सोलापूरसाठी प्लास्टिकचा वापर टाळा.” प्रा.सुशीला आबुटे, महापौर

प्लास्टिक पिशव्यांवर अद्याप कारवाई नाही

महापौरांनी प्लास्टिक कपांना नकार दिला आहे. परंतु ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असूनही त्यांचा शहरात मुक्त वापर दिसून येतो. त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेतील अन्न औषध विभागाकडे आहे. परंतु ही यंत्रणा अद्याप हलण्यास तयार नाही. त्याबाबतही महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना द्याव्यात, असे पर्यावरणप्रेमींनी म्हटले आहे.

दररोज हजार कप

महानगरपालिका परिसरातील इंद्रभुवन, कौन्सिल हॉल येथे कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक आणि ये- जा करणाऱ्या नागरिकांना चहा देण्यासाठी दररोज हजार प्लास्टिक कपांचा वापर होतो. त्याच्या विल्हेवाटीची कुठलीच यंत्रणा नाही. आवारातील बागेत हे कप इतस्तत: टाकले जातात. त्याचा मोठ्या प्रमाणावर कचरा होतो. महापौरांच्या आदेशानंतर आता ही स्थिती बदलेल, असे अपेक्षित आहे.