आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

108 ठिकाणी बरसल्या एक हजार 48 नवोदितांच्या काव्यधारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मेघदूत या अजरामर काव्याची निर्मिती करणार्‍या कवी कुलगुरू कालिदासाच्या जयंतीनिमित्त आषाढाच्या पहिल्या लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने 108 ठिकाणी काव्यसंमेलनांचे आयोजन करण्यात आले. केवळ शहर आणि जिल्ह्यातच नाही तर छत्तीसगड आणि कर्नाटकातही काव्यसंमेलने घेतली गेली. या संमेलनांमध्ये 1048 नवोदित कवी सहभागी झाले. नवोदित कवींच्या नव्या आशयाच्या कविता हे या संमेलनांचे वैशिष्ट्य ठरले.

पाऊस, पर्यावरण, तरुणाईवर केल्या कविता
सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह अन्य राज्यांमध्ये आयोजित काव्यसंमेलनांमध्ये विविध विषयांवर कविता सादर झाल्या. यातून नवोदित कवींना व्यासपीठ मिळाले. पाऊस, पर्यावरण, तरूणाईचे विश्व, आई-वडिलांवरील प्रेम यासारखे विषय तरुणाईने हाताळले.

नवोदितांसह दिग्गज कवीनींही घेतला सहभाग
विविध ठिकाणी झालेल्या कविसंमेलनांमध्ये ए. डी. जोशी, अपर्णा हेलकर, अश्विनी लिके, रूपाली अवचडे, बदीउजम्मा बिराजदार, अविनाश बनसोडे, राजेंद्र डांगे, डॉ. अजिज नदाफ, पुरुषोत्तम नगरकर, विश्वनाथ निंबाळे, आशा पाटील, स्वाती पाटील, प्रज्ञा निंबाळकर, प्रमिला राऊत, शैलेंद्र पाटील, उर्मिला करवा, वंदना कुलकर्णी यांच्यासह 1048 नवोदितांनी स्वरचित कविता सादर केल्या.

या होत्या कविता
मेघ असे आसुसलेले, थेंब थेंब बरसण्यासाठी
फुलतील लाख कळ्या,येथे तुझ्याचसाठी
तुझेच गाणे गुणगुणतो, गाईलेस जे कातवेळी ..
चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसतं

परराज्यातही प्रवाह
छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यातील सहरनपूर लोहाराच्या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिपल की उंची डाली पर, भारत माता के बेटे है हम, चलते सीना तानके, सब मिल जुल कर रहते अशा एकापेक्षा एक कविता सादर केल्या. यावेळी कवी मोहन जोशी आणि अजय भांगडे यांनी भरगच्च कविता सादर केल्या.

येथे झाली कविसंमेलने
जोडभावी पेठ, अवंती नगर, साखर पेठ, हैदराबाद रोड, विजापूर रोड, अशोक चौक, होटगी रोड, रेल्वे लाइन, कुरूल, तेरा मैल, बीबी दारफळ, वैराग, अक्कलकोट, पानमंगरूळ, मोहोळ, वंकलगी, भंडारकवठे, बार्शी, पंढरपूर, करकंब, टेंभुर्णी, वागदरी, माढा, मोडनिंब, करमाळा, कुडरुवार्डी, सांगोला, जेऊर, वडाळा आदी ठिकाणी काव्यसंमेलने झाली.