सोलापूर- कुंभारी येथील गोदूताई विडी घरकुलमधील ग्रुप येथे बुधवारी मूर्ती विटंबनेचा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर या भागात तणाव आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विडी घरकुल येथील मुख्य चौकात एका जमावाने घोषणाबाजी देत दुकाने बंद केली. त्यामुळे तणाव वाढला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचवून जमाव पांगविला. याठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवल्यानंतर तणाव निवळला. गोदूताई विडी घरकुलमधील ग्रुप येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास मूर्ती विटंबनेचा प्रकार घडला होता. त्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला होता. दोषींना आठ दिवसांत अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर प्रकरण शांत झाले. या प्रकरणी बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोषणाबाजीमुळेसकाळी तणाव : मात्र,गुरुवारी सकाळी एका जमावाने विडी घरकुलच्या मुख्य चौकात घोषणाबाजी करीत या भागातील दुकाने बंद करण्यास भाग पाडले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतले आहे. या भागात पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. दरम्यान, माजी आमदार नरसय्या आडम यांनीही नागरिकांना शांततेचे आवाहन केले. या वेळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, साहाय्यक जिल्हा अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उपअधीक्षक मनीषा दुबल आदी उपस्थित होते