आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्याच्या चौकटीतच करता येतील सार्वजनिक सण‑उत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- 'मी सामान्य माणूस असून, मलाही सामान्य माणसांसाठी काम करायचे आहे. त्यांची नवी ओळख झाली पाहिजे. वाहतूक सुधारली पाहिजे, गुन्हेगारी, घरफोड्या थांबल्याच पाहिजेत. प्रत्येकला सण, उत्सव साजरे करण्याचा अधिकार आहे. पण कायद्याच्या चौकटीत आणि कुणालाही त्रास होता. कायदाच्या बाहेर गेलात तर मी सोडणार नाही' असा खणखणीत इशारा पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी बुधवारी दिला. श्रमिक पत्रकार संघ क्राइम रिपोर्टर असोसिएशनतर्फे श्री. सेनगावकर यांचा संघाच्या कार्यालयात वार्तालाप झाला. त्यावेळी ते बोलत होते.
दारू, मटका, जुगार क्लब चालकांना हद्दपार करणार
मटका, जुगार, हातभट्टी चालवणाऱ्यांना मी हद्दपारच करणार आहे. एमपीडीए, मोकाअंतर्गंत कारवाई करण्यासाठी चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. क्राइम रिपोर्टरचे अध्यक्ष अनिल कदम यांनी स्वागत केले. संजय जाधव यांनी आभार मानले.
हेल्मेट : सक्ती आहेच साथ द्यावी
वाहन चालवताना हेल्मेट वापरणे कायद्याने बंधनकारक आहे. फक्त त्याची अंमलबजावणी होत नाही. अपघातात जीव जाण्यापेक्षा सुरक्षा उपाय म्हणून हेल्मेट वापरा. सुरुवातीला आठ दिवस सूचना देतील. प्रत्येकी शंभर रुपये दंड राहील.
पासपोर्टसाठी पैसे देऊ नका
पासपोर्ट चारित्र्य पडताळणीसाठी पोलिस चिरीमिरी (पैसे) मागत असतील तर मला त्यांचे नाव अथवा फोटो काढून मेसेज अथवा व्हॉट्सअॅप करा. त्या पोलिसांचेच चारित्र्य दाखवतो. (म्हणजे कारवाई करतो) पण, तुम्हाला विनासायास दाखला मिळेल. चिंता करू नका.
दुचाकी रायडर्सची नेमणूक होणार
मंगळसूत्र हिसकावून चोरटे दुचाकीवरून जातात. पाठलाग करण्यासाठी पोलिसांना त्या पद्धतीने गाडी चालवता येत नाही. यासाठी सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरुण पोलिस अथवा खासगी तरुणांची मदत घेऊन मोटारसायकल रायडरर्स पथक नेमणार आहे.
पोलिस चांगलेच आहेत फक्त मार्ग दाखवू
- नागरिकांनीही आधुनिक सुविधांचा वापर करून सुरक्षा व्यवस्थेस प्राधान्य द्यावे.
- मला व्हॉट्सअॅप, करा, आपणाला मदत मिळेल (मोबाइल: ९८२३९५४०००)
- आमचे पोलिस अधिकारी, कर्मचारी चांगलेच आहेत. त्यांना योग्य दिशा दाखवतोय.
- एक-दोन टक्के आहेत त्यांनाही टप्प्या-टप्प्याने शिस्त लावतो. सर्व गोष्टी एकदम होत नाही.

ठळक मुद्दे
- रेकॉर्डवरीलगुन्हेगारांची यादी काढली असून त्यांची लवकरच चौकशी करणार.
- तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेस महिला गस्तीपथक तैनात करणार.
- ३० जून ते जुलैदरम्यान उत्सव मंडळ, मोहल्ला कमिटी, मान्यवर व्यक्तींच्या बैठका आहेत.
- १ जुलैपासून गुन्हे तपास, बंदोबस्त, रूटीन काम यासाठी पोलिस पथक वेगळे राहतील
- सोसायट्या, कॉलन्या, घरात सीसीटीव्ही लावून घ्या
- दागिने, पैसे घरात ठेवता, बँक लॉकरमध्ये ठेवा
- मटका, जुगार, हातभट्टी दारू चालणार नाही
बातम्या आणखी आहेत...