आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस निरीक्षक, सहा कर्मचार्‍यांना कारावास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा - रमेश शंकर काळे यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी मंगळवेढय़ाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मुरलीधर बालाजी मुळूक यांच्यासह सहा पोलिस कर्मचार्‍यांना मंगळवेढा न्यायालयाने तीन वर्षे कारावास आणि प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 15 वर्षांपूर्वी घटलेल्या या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. न्यायाधीश डी. एन. खेर यांनी सोमवारी हा निकाल दिला. मुळूक हे सध्या कराड येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

एका दरोड्याच्या प्रकरणात 25 जून 1998 रोजी पारधी समाजातील रमेश शंकर काळे (रा. अरळी, ता. मंगळवेढा) याला तत्कालीन साहाय्यक पोलिस निरीक्षक मुरलीधर मुळूक यांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. गुन्हा कबूल करावा, यासाठी मुळूक यांच्यासह हणमंत शंकर माने, नागेश शंकर उखळे, शहाजी एकनाथ मुळे, श्रीमंत श्रीपती बोडके, ब्रह्मदेव बंडा थोरात, राजकुमार शरणप्पा उपासे यांनी काळे याला पोलिस कोठडीत बेदम मारहाण केली होती. यामध्ये काळे याचा मृत्यू झाला.

या घटनेची चौकशी सीआयडीमार्फत करून आरोपींविरुद्ध मंगळवेढा न्यायालयात भा.दं.वि. 330, 348, 201, 34 प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सीआयडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सज्रेराव पाटील यांच्यासह 11 जणांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी पकाले, नागनाथ जोध, मृताची पत्नी सुमाबाई काळे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सहा साक्षीदार फितुर झाले.

रजिस्टरमध्ये होती खाडाखोड
आरोपीला बेदम मारहाण केल्याने त्याच्या अंगावर जखमा होत्या. अटक उशिराची दाखवण्यात आली. मारहाण लपवण्यासाठी आवक-जावक रजिस्टरमध्ये खाडाखोड केल्याचे फिर्यादीचे वकील अँड. संतोष माने बेगमपूरकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.