सोलापूर - आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आमदार दिलीप माने, नगरसेवक नागेश ताकमोगे यांच्यावर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी हॉटेल अंबरजवळील मैदानात घडली. भरारी पथकाचे श्रीहरी कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.
दसरा महोत्सवानिमित्त रावण दहन कार्यक्रम या ठिकाणी झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माने होते. त्यावेळी ताकमोगे यांनी त्यांचा गौरव करून त्यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन केले. शोभेच्या दारूकामात पंजा हे चिन्ह प्रदर्शन करून आचारसंहितेचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या घटनेत शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचार रॅलीसाठी पोलिसांची परवानगी घेऊन नियमाचे पालन केले नाही म्हणून फौजदार चावडी पोलिसात शशिकांत कैंची (रा. मुरारजी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार सचिन सुरवसे यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी हा प्रकार एन. जी. मिल चाळीजवळ घडला. साहाय्यक पोलिस निरीक्षक कोळी तपास करत आहेत.