आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - जुळे सोलापुरात चैतन्य भाजी मंडई परिसरात सोमवारी रात्री एका इसमास मारहाण झाली. त्यात दुसर्या एका इसमास जो सोडवायला गेला होता, त्यालाही धक्काबुक्की झाली व त्याचे पैसे लांबविले गेले. ही सोमवारची घटना. पण, प्रत्यक्षात हालचाली झाल्या मंगळवारी. सोमवारच्या घटनेतील मारहाण कोणी केली असावी यासंदर्भातील माहिती फिर्यादीने पोलिसांना दिल्यानंतरही शुक्रवारपर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती आणि फिर्यादीला एफआयआरची नक्कलही दिलेली नव्हती. सगळ्या बाबींना उशीर झाला. हे एक उदाहरण आहे.
त्यापूर्वी काही दिवस अगोदर पूर्व भागातील कन्ना चौकजवळ दोन गटांत हाणामारी झाली, त्या घटनेबाबतही असेच घडले. काही घटनांमध्ये खूपच उशिराने दखल घेतली गेली. काही प्रकरणात तर रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात तपासासाठी दाखल करण्याचे प्रकार घडलेले आहेत. काही घटनांमध्ये दक्षता म्हणून असे पोलिस मुद्दामही करत असतील, पण हे प्रमाण खूपच कमी आहे. लवकर अटक करून ती उशिराने नोंद करून घेण्याचाच तो प्रकार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना सुटण्यास वाव पोलिस देतात, असे फिर्यादीला वाटते. क्राइमरेट कमी दाखवण्यासाठी असे प्रकार होत असावेत, असे काहीजणांचे म्हणणे आहे.
लगेच तक्रार नोंदवून घ्यावी
क्रिमिनल कोड कलम 154 नुसार दखलपात्र गुन्ह्याची नोंद घ्यावीच लागते आणि तसा गुन्हा असेल तर कोणीही फिर्याद देऊ शकतात. पण गुन्हा दखलपात्र आहे की नाही यातूनच घोळ घातला जातो. दुसरी बाब म्हणजे तक्रार किंवा गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर त्याची एक नक्कल फिर्यादीला दिली गेली पाहिजे आणि एक नक्कल न्यायदंडाधिकार्यांकडे पाठवली पाहिजे. पण इतकी जलद प्रक्रिया सध्यातरी दिसत नाही. गुन्हा दाखल करून घेण्यापेक्षा फिर्यादीला पिटाळून लावण्याचा प्रकार दिसून येतो.
तक्रार नोंदवून न घेतल्यास पर्याय
0 फिर्यादी आपली तक्रार पोस्टानेही पोलिस ठाण्याला पाठवू शकतो.
0 न्यायदंडाधिकार्यांकडे खासगी फिर्याद नोंदवून दाद मागू शकतो.
0 अशा प्रकरणात कलम 156 नुसार न्यायदंडाधिकारी फिर्याद चौकशीसाठी पाठवू शकतात.
0 कोर्टात दाद मागूनही फिर्याद नोंदवून घेण्यास भाग पाडता येते.
0 या सर्व फौजदारी प्रक्रिया कलम 1973 नुसार चालतात.
तक्रार न घेतल्यास वरिष्ठाकडे दाद मागता येते.
आता गार्हाणी दिवस
पोलिसांकडून कोणत्या तक्रारीबाबत काय कारवाई चालू आहे, याची माहिती फिर्यादीला किंवा संबंधितांना व्हावी यासाठी आता ‘गार्हाणी दिवस’ पोलिसांनी सुरू केला आहे. दर शनिवारी फिर्यादीला त्याच्या प्रकरणात काय तपास चालू आहे, याची माहिती दिली जाते. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. या उपक्रमाचा दोन आठवड्यांत 66 जणांनी माहिती करून घेण्यासाठी उपयोग करून घेतला आहे.शहरातील प्रमुख पोलिस ठाण्यात हा दिवस पाळला जातो.
गंभीर गुन्ह्यांची दखल घेतली जाते
गुन्हा घडल्यानंतर त्याचक्षणी नक्की आरोपी कोण आहेत हे फिर्यादीच्या तोंडून येत नाही किंवा कोणीही लगेच सांगत नाहीत. त्यामुळे अज्ञात इसमाच्या नावे नोंदी कराव्या लागतात. त्यातून पुढे फिर्यादी न्यायालयीन प्रक्रियेत फारसा टिकत नाही. पोलिसांकडून विनाकारण फिर्याद घेणे टाळले जात नाही. सर्व कायदेशीर बाबींचा विचार केला जातो. परवा कन्ना चौकात घडलेल्या दोन गटांतील हाणामारीच्या घटनेमध्ये फिर्याद द्यायला कोणीही पुढे आले नाही. त्या जखमीनेही अद्याप जबाब दिला नाही, अशा प्रकरणात पोलिसही फार काही करू शकत नाहीत. त्यातून काही बाबी निर्माण होतात. पण, जेथे दखलपात्र गुन्हे घडतात तेथे पोलिसच तक्रार दाखल करतात आणि पुढील तपास करतात. त्यामुळे पोलिस ठाण्यांमध्ये नोंदी घेण्याचे टाळले जाते किंवा उगाच उशीर होतो असे वाटत नाही. ’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त
कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात तडजोडीला वाव
कौटुंबिक हिंसाचाराच्या विशेषत: पती, पत्नीमधील तक्रारींच्या घटनांमध्ये फिर्याद आल्यानंतर पोलिसांकडून ती महिला पोलिस निवारण केंद्राकडे पाठवली जाते. तेथे तडजोडी होऊन किंवा समन्वयाने प्रकरण मिटले नाही तर पोलिस गुन्हा नोंदवून पुढील प्रक्रिया पूर्ण करतात. या एकाच प्रकरणात केवळ कौटुंबिक कलह होऊ नये हाच त्यामागचा हेतू आहे.
नक्कल देणे आवश्यक
कोणत्याही घटनेत पोलिसांकडून जखमींवर उपचार करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर नोंदी घेण्याचे काम होत असते. फिर्यादीची नक्कल देणे आवश्यकच आहे. पण फिर्यादीची नक्कल लिहिण्यापर्यंतचा वेळ पोलिसांना मिळाला पाहिजे. पण फिर्याद लिहून झाल्यानंतरही दिली नाही तर मात्र संबंधितांवर कारवाई होते.’’ काळूराम धांडेकर, पोलिस निरीक्षक
फिर्याद घेणे पहिले काम
घटना कुठेही घडली असली तरीही हद्दीचा वाद न घालता जेथे आहे तेथे फिर्याद नोंदवून घेतली पाहिजे. नंतर ती संबंधित हद्दीच्या पोलिसांकडे पाठवता येते. घटना घडल्यानंतर फिर्याद नोंदवून घेणे हे पहिले काम आहे. ते टाळता येणारे नाही. पण नागरिकांनीही कायद्याच्या दृष्टीने सर्व बाबी जाणून घेतल्या पाहिजेत, त्यादृष्टीने सज्ञान झाले पाहिजे.’’ धनंजय माने, ज्येष्ठ विधीज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.