आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरात पोलिस यंत्रणा झाली सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून सुमारे चार हजारहून अधिक पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल मंदिर आणि यात्रेमध्ये सहभागी होणा-या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांनी दिली.

या संदर्भात माहिती देताना कदम म्हणाले, ‘मागील वर्षी आषाढी यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. त्याच धर्तीवर या वर्षीच्या आषाढी यात्रेच्या बंदोबस्ताचे पोलिस प्रशासनाकडून खास नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी चार अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख, दहा उपविभागीय पोलिस अधिकारी असा ताफा आहे. यात्रेसाठी राज्याच्या कानाकोप-यातून तसेच शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच मध्य प्रदेश येथून देखील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यात्रेच्या काळात येथील जास्त गर्दीची ठिकाणे असलेले श्री विठ्ठल मंदिर परिसर, दर्शन मंडप, दर्शनाचे पत्राशेड, संपूर्ण दर्शन रांग आणि चंद्रभागा वाळवंट या भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

दरवर्षीप्रमाणे येथील पोलिस संकुलमध्ये बाहेरून आलेले वरिष्ठ अधिकारी तसेच शहरातील विविध लॉजेस, मठ, धर्मशाळांमध्ये मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी वास्तव्यास आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे दाखल झाल्यामुळे सध्या पंढरपूर शहराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. वारक-यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा अत्यंत काळजी घेत आहेत.

जिल्हा पोलिसप्रमुख पंढरपूर मुक्कामी
आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस प्रमुख मकरंद रानडे हे स्वत: जातीने लक्ष घालून बंदोबस्ताचे नियोजन करीत आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्यांनी नुकताच जिल्ह्यात प्रवेश केला असल्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुख हे या आषाढी एकादशीपर्यंत पंढरपुरातच मुक्कामासाठी थांबून संपूर्ण यात्रेच्या बंदोबस्तावर नियंत्रण ठेवणार आहेत.

एसपी दर्जाचे चार अधिकारी
यात्रा बंदोबस्ताच्या नियोजनासाठी पोलिस प्रशासनाकडून अन्य भागातील चार अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख मदतीस देण्यात आले आहेत. या पैकी एका अधिका-यावर माउलींच्या तर दुस-यावर तुकोबारायांच्या दिंडीच्या बंदोबस्ताची जबाबदारी दिली आहे. श्री विठ्ठल मंदिराच्या सुरक्षिततेसाठी एका अधिका-याची तर अन्य एका अधिका-यावर पंढरपूर तालुक्यातील बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली आहे.

असा फौजफाटा
300 पोलिस निरीक्षक तसेच साहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, 3000 महिला तसेच पुरुष पोलिस कर्मचारी, 1000 महिला व पुरुष होमगार्ड, नऊ एसआरपीच्या कंपन्या, आठ बॉम्बशोधक पथके, चार दंगा काबू पथके या शिवाय वारकरी वेशातील महिला आणि पुरुष पोलिस कर्मचा-यांची पथके खास बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत.