आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सवासाठी करताहेत पालिका, पोलिस तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात आगामी काही दिवसांत विविध धार्मिक उत्सव साजरे होणार आहेत. त्यानिमित्त महापालिका, पोलिस प्रशासन तयारीला लागले आहे. पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव 10 ऑगस्टला आहे. त्याच्या मार्गाची पाहणी महापौर अलका राठोड यांनी बुधवारी केली. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांची बैठक झाली.

रथोत्सवाच्या मार्गावर खड्डे असून त्याची दुरुस्ती दोन दिवसांत करण्याच्या सूचना महापौर राठोड यांनी महापालिकेच्या अधिका-यांना दिल्या. मार्गाच्या स्थितीविषयी मंगळवारी सभागृहात नगरसेवक अनिल पल्ली, इंदिरा कुडक्याल आदी नगरसेवकांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानुसार बुधवारी सकाळी महापौर कक्षात बैठक झाली. यावेळी समाजाचे जनार्दन कारमपुरी, विष्णू कारमपुरी आदी समाजबांधव उपस्थित होते. पालिकेचे नगर अभियंता गंगाधर दुलंगेसह झोन अधिका-यांसोबत जाऊन पाहणी केली. मिरवणूक मार्गावर खड्डे पडले असून, बाजूला अतिक्रमण आदी अडथळे आहेत. खड्ड्यात खडी टाकून त्यावर मुरूम टाकावे, अतिक्रमण त्वरत काढावे, असा आदेश महापौर राठोड यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

रविवारी श्रावणीचे आयोजन
विश्व मध्व महापरिषद सोलापूर शाखेतर्फे रविवारी श्रावणीचे आयोजन केले आहे. स्वामी सत्यात्मतीर्थ यांच्या आज्ञेनुसार माध्व संप्रदायातील भक्तांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी सात ते नऊ या दरम्यान विद्यानिधी आचार्य यांच्या निवासस्थानी (नम्रता सोसायटी, नडगिरी पेट्रोल पंपासमोर, विजापूर रस्ता) करण्यात आले आहे. याचे पौरोहित्य पंडित विद्यानिधी आचार्य व पंडित नरसिंहाचार्य करणार आहेत.

गणपती मंडळ-पोलिस मित्र योजना राबवणार

गणपती उत्सवाला आणखी पंचवीस दिवस अवधी आहे. पण, पोलिसांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पोलिस ठाण्यानुसार गणपती उत्सव मंडळ व पोलिस-मित्र योजना राबवून मंडळ आणि पोलिस यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. येत्या आठवड्यात यासाठी तयारी सुरू करणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.

गणपती उत्सव व विधानसभा निवडणुकी संदर्भात बुधवारी मुंबईत राज्यातील सर्व पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त यांची समन्वय बैठक झाली. पोलिस महासंचालक कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी, गणपती मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक होणार आहे.
पोलिस सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना देणार आहे. तसेच मंडळाच्या काही समस्या सोडवण्यासाठी नियोजन होणार आहे. पोलिस मित्र योजनेच्या माध्यामतून पाच मंडळांसाठी एक पोलिस नेमणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते त्या पोलिसांसोबत संवाद साधतील. सूचना पोलिसामार्फत थेट मंडळांना दिली जाईल.