आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा पोलिसप्रमुख मकरंद रानडे रुजू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नूतन जिल्हा पोलिसप्रमुख मकरंद रानडे यांचे रात्री सव्वानऊच्या सुमारास सोलापुरात आगमन झाले. मुरारजी पेठेतील विश्रामगृहात दहा मिनिटे थांबून त्यांनी लगेच कार्यालयाकडे धाव घेतली. पावणेदहाच्या सुमारास त्यांनी पदभारही घेतला. त्यांच्या स्वागतासाठी कार्यालयाबाहेर अधिकारी रांगेने उभे होते. प्रत्येकाने एक बुके दिला. दहा बुके हाती पडल्यानंतर रानडे म्हणाले, ‘‘आता सर्व बुके घ्या आणि प्रत्येकाच्या टेबलावर ठेवा.’’ समूहाच्या वतीने एकाने बुके देऊन स्वागत केले असते तर ‘टीमवर्क’ दिसून आली असती, हेच त्यांना सांगायचे असावे.

पुण्याच्या पोलिस उपायुक्त पदावरून श्री. रानडे सोलापूरच्या जिल्हा पोलिस प्रमुखपदी आले. रात्री त्यांचे आगमन झाले तरी पदभार घेतील, असे वाटले नव्हते. परंतु दोन दिवसांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सोलापूर दौरा आहे. त्याच्या नियोजनासाठी त्यांनी तातडीने पदभार घेऊन कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण केले. अप्पर पोलिस अधीक्षक तुषार दोशी त्यांच्या दिमतीला होते. अधिकारी अप्पासाहेब शेवाळे, भास्कर थोरात आदी उपस्थित होते.

.. अन् इकडे सारीपाट
गुरुवारी नव्या पोलिस प्रमुखांचे सोलापुरात आगमन झाले. ते रात्री कार्यालयात येत आहेत, याची माहिती असूनही कार्यालयाबाहेर काही पोलिसांचा सारीपाट सुरू होता. पदपाथवरच चार-पाच पोलिसांचा हा खेळ रंगलेला होता. विजेच्या खांबावरील दिव्याच्या प्रकाशात ते खाली बसलेले होते. त्यांच्या अंगात खाकी वर्दी होती. हातात पत्ते होते. शेजारीच उभे असणार्‍या दोन पोलिसांच्या अंगावरही वर्दी होती. वरून स्वेटर घातलेले होते.