आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची मदत उरली फलकापुरतीच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर बसस्थानकावर ये-जा करणार्‍या प्रवाशांना ‘पोलिस-आपणाला मदत पाहिजे काय’ असा फलक झळकताना दिसतो. पण शेजारच्या तीनही खुर्च्या पोलिसाविना अनेकदा रिकाम्याच असतात. एखादी अप्रिय घटना घडली तर अनेकदा प्रवाशांना दाद कुठे मागायची असा प्रश्न असतो. कारण, त्या कक्षात पोलिसच बसलेले नसतात.

फौजदार चावडी पोलिस अंतर्गत तरटी नाका पोलिस चौकीच्या हद्दीत बसस्थानक परिसर येतो. पोलिस चौकीचे चार पोलिस कॉन्स्टेबल दोन श्फ्टिमध्ये सेवेत असतात. पण प्रवाशांच्या सोईसाठी पोलिसदादा आपले कर्तव्य बजावतील का? असा प्रश्न प्रवाशी करतात. दररोज बसस्थानकावर हजारो प्रवाशांची ये-जा असते. त्या तुलनेत पोलिसांची कुमक स्थानकावर कमी आहे. त्यातच प्रवाशांना चोरट्यांप्रमाणेच खासगी वाहनांचे काही एजंट व काही रिक्षाचालक यांच्या अरेरावीला सामोरे जावे लागते.


हातोहात पळविले जातात पैसे, मोबाइल, दागिने
मागील महिन्यात उदगीरच्या एका व्यापार्‍याची बॅग कापून पाच लाख रुपये चोरण्यात आले. या घटनेचा तपास नाही. याशिवाय पाकीट मारणे, मंगळसूत्र हिसकावणे, बॅग चोरणे या घटना नेहमीच घडतात. अनेकदा प्रवाशी लांब पल्ल्याचे असतात. बस सोलापूर सोडून लांब अंतरावर गेल्यानंतर चोरीची बाब प्रवाशांच्या लक्षात येते. हे प्रकरण पोलिसांकडे येत नाही. त्यामुळे पोलिसांना या घटनेची तीव्रता कळून येत नाही. मागील वर्षाची आकडेवारी पाहिल्यास पाकीट, मोबाइल, दागिने हिसकावणे असे दहा गुन्हे पोलिसात नोंद आहेत. पण, अनेक गुन्हे दाखल नाहीत. सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यान्वित केल्यास या घटनांवर जरब बसेल. पोलिसांना त्या आधारे तपासही करता येईल.


महिला पोलिस नेमा
दोन पोलिसांची इथे नेमणूक असते. त्याऐवजी एक महिला व एक पुरूष अशी नेमणूक दिल्यास महिला प्रवाशांचे प्रश्न हाताळणे सोपे होईल. मदत कक्षात कायमस्वरूपी पोलिस बसल्यास घटना थांबतील. रात्रीसुध्दा पोलिसांचे पेट्रोलिंग हवे. एन. बी. मोरे, बसस्थानक प्रमुख


पोलिस पथक नेमणार
मदत कक्षात पोलिस बसण्यासाठी अधिकार्‍यांमार्फत सूचना देण्यात येतील. महिला पोलिसही नियुक्त करता येईल काय हे पाहू. आजपासूनच पोलिस पथक नेमू, पेट्रोलिंग वाढवू. सुभाष बुरसे, पोलिस उपायुक्त