सोलापूर- सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय आस्थापनेवरील पोलिस भरती 2014 ची लेखी परीक्षा 15 जून रोजी सकाळी 7 वाजता पोलिस मुख्यालय येथे झाली. परंतु आजपर्यंत त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. यासंदर्भात पोलिस आयुक्त रासकर यांना विचारले असता त्यांनी पोलिस उपायुक्त सानप यांना विचारा असे सांगितले. तर र्शीमती सानप यांनी दोन दिवसांपूर्वीच निकाल बनवून पोलिस आयुक्तांकडे दिल्याचे सांगितले. या परस्पर वक्तव्यामुळे भरती प्रक्रियेत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच निकाल तयार असतानाही तो का जाहीर केला जात नाही याबाबतही सवाल उपस्थित केला जात आहे. शहर व ग्रामीण विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पण, निकालास होणारा विलंब, तसेच परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांना प्रश्नपत्रिका द्यायच्या का नाहीत यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. शहर विभागाकडून पेपर झाल्यावर प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. परंतु, ग्रामीण विभागाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत.
लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका दिल्या नसल्याने वाद
यापूर्वीही प्रश्नपत्रिका दिल्या जात नव्हत्या, आताही दिल्या नाहीत. शिवाय विचारलेलेच प्रश्न पुढच्या परीक्षेत येतीलच असे नाही. शासकीय नियमांचे पालन करून पारदर्शी कारभार सुरू आहे. याबाबत शंका असल्यास त्याचे निरसन केले जाईल. मकरंद रानडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका दिल्या पाहिजेत. एखाद्या प्रश्नाबाबत शंका असल्यास विद्यार्थी तो घरी जाऊन गुणाचा अंदाज काढू शकतो. यंदा प्रश्नपत्रिका दिल्या नाहीत. यातून पोलिस प्रशासनाकडून काय साध्य करण्यात आले ते माहीत नाही. काशिनाथ भतगुणकी, ड्रिम फाउंडेशन
या परीक्षेस एकूण 791 परीक्षार्थी होते. वेळेत निकाल लावण्याचे काम केले आहे. हा निकाल तयार करून पोलिस आयुक्तांकडे मान्यतेसाठी सुपूर्द केलेला आहे. अश्विनी सानप, पोलिस उपायुक्त, सोलापूर आयुक्तालय