आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात मालिका थांबवण्यासाठी पोलिसांची धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हैदराबाद रस्त्यावरील मार्केट यार्डासमोरील चौक नो पार्किंग झोन करण्याचा निर्णय आणि अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली. तसेच दुपारी शहरातून सुरू असलेल्या जडवाहतुकीविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.

परिसरातील हॉटेल, दुकान, पानटपरी, हातगाडी विक्रेते यांनी केलेले अतिक्रमणही हटवण्यात आले. तसेच येथे सिग्लन यंत्रणा उभी करण्याचाही निर्णय झाला. तसा प्रस्ताव वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस महापालिका प्रशासनास देणार आहेत. या परिसरात गुरुवारी हृदय पिळवटून टाकणारा अपघात घडला होता. त्यापार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त सुभाष बुरसे, साहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्राम यांनी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमाराला पाहणी केली.
पुणे-हैदराबाद रस्त्यावर गुरुवारी दुपारी व सायंकाळी ट्रकने दोघांचे बळी घेतले. यापूर्वीही अनेकांचे बळी गेले आहेत. दुपारी दीडनंतर जड वाहने सुटल्यानंतर अपघात होत आहेत. याला रस्ते, खड्डे, रस्त्याच्या बाजूने वाढते अतिक्रमण, पोलिसांचे ढिसाळ नियोजन, नागरिकांचा बेशिस्तपणा हे घटक जबाबदार आहेत.
या वेळी साहाय्यक आयुक्त जनार्दन तिवटे, निरीक्षक यशवंत शिर्के, काळुराम धांडेकर, लक्ष्मण जाधव, विष्णू पवार यांच्यासह कमांडो पथक, पोलिस अधिकारी, वाहतूक पोलिसांचा ताफा, महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख वसंत पवार उपस्थित होते.

सुरक्षा पंधरवड्यातच अपघात :

जानेवारीच्या 3 ते 17 तारखेपर्यंत रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा झाला. गड्डा यात्रा व व्हीआयपी बंदोबस्तात हा पंधरवडा केव्हा संपला आणि पोलिसांनी काय विशेष उपाययोजना केली हे कळलेच नाही. महत्त्वाची बाब म्हणजे याच पंधरवड्यात वाहनांच्या अपघातात चार बळी गेले. या घटनांना रस्ते, नागरिकांचा बेशिस्तपणा, वाहतूक नियोजन या बाबीही कारणीभूत आहेत. पण, वाहतूक पोलिस अपघात होऊ नये म्हणून रस्त्यांची व सिग्नल यंत्रणा चालू आहे का याची पाहणी करणे, बांधकाम खाते, महापालिका विभाग यांना सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव देणे ही कामे तातडीने करावीत. महापालिका प्रशासनही गांभीर्याने मूलभूत सुविधा देत नाही.

सिग्नल बंद ठेवल्यास कारवाई

शहरात तेरा ठिकाणी सिग्नल चालू आहेत. जुना बोरामणी नाका, जुना होटगी नाका, गांधी नगर या चौकातील सिग्नल महिनाभरापासून बंद आहेत. अन्य चौकांतील म्हणजे डफरीन व सरस्वती चौकातील सिग्नल सोडून आठ चौकांत बंदच असतात. याबाबत उपायुक्त स्मार्तना पाटील यांना विचारले असता त्या म्हणाल्या, सिग्नल बंद पडल्यास तत्काळ वरिष्ठांना माहिती देणे, ठाणे अंमलदाराला सांगून स्टेशन डायरीत नोंद घेण्याचे काम पॉइंटवरील पोलिसांचे आहे. तपासणीत अथवा चौकशीत सिग्नल चालू आहे, पण पोलिसांनी बंद ठेवल्याची माहिती मिळाली तर चौकातील संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात येईल. हा नियम शनिवारपासून लागू होणार आहे. र्शी. आत्राम यांना त्यांनी याबाबत आदेश दिले आहेत. पोलिसांनाही सूचना देण्याचे आदेश आहेत.

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणतात

जुना बोरामणी नाका, मार्केट यार्ड चौकात दोन पाळय़ांत पोलिसांची होणार नेमणूक
सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत चार पोलिस, एक फौजदार अशी केली जाणार व्यवस्था
सध्या सुरू असलेली जड वाहतूक दुपारी सुरू ठेवायची की नाही याबाबत लवकरच बैठक
मार्केट यार्ड चौकात सिग्नलचा प्रस्ताव देणार
अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न राहतील
परिसरात दोन्ही बाजूने 100 मीटर नो पार्किंग झोन

मार्केट यार्ड चौकात शुक्रवारी अतिक्रमण काढण्यात आले. (खाली) दुपारी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी पाहणी केली. वाहतूक नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली. यावेळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी वसंत पवार, उपायुक्त स्मार्तना पाटील, साहाय्यक आयुक्त मोरेश्वर आत्राम, निरीक्षक यशवंत शिर्के उपस्थित होते.

जुना कारंबा नाक्याजवळ अपघात; मुलगा ठार

जुना कारंबा नाकाजवळील नवीन डी मार्ट समोर रस्ता ओलांडताना ट्रकच्या धडकेने सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला घडला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री नऊच्या सुमाराला मृत्यू झाला. सर्मथ किसन पोतदार (वय 6, रा. मसरे वस्ती, नवीन डी मार्ट समोर, जुना कारंबा नाका) या मुलाचा मृत्यू झाला. सर्मथ हा दूध आणण्यासाठी मसरे वस्तीतून रमाबाई आंबेडकर नगराकडे जात होता. त्यावेळी रस्ता ओलांडताना त्याला वाहनाची धडक बसली. जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. सर्मथचे वडील शेतात मजुरी करतात. पसारे वस्तीत ते राहतात. पंधरवड्यात तिघांचा अपघातात बळी गेला आहे. जोडभावी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी दोन बळी गेले आहेत. पालिका आणि पोलिस प्रशासन उपाय योजण्यात अपयशी ठरत आहेत