सोलापूर - मागील गुरुवारी पोटफाडी चौकात ग्रामीण पोलिस मुख्यालयाची पोलिस व्हॅन धडकून दुचाकीवरील सुलतानपुरे या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमाराला सिव्हिल चौकात शहर पोलिस मुख्यालयाची व्हॅन एका नामवंत मानसोपचार डॉक्टरच्या कारला धडकली. यात पुढील चाकावरील बॉनेटचे मोठे नुकसान झाले.
अपघात झाला सिव्हिल चौकात पण तारतम्य म्हणून चालक थांबलाच नाही. डॉक्टरने पाठलाग करून ती व्हॅन होम मैदानाजवळ थांबवली. अपघात झाल्याचे डॉक्टरने चालकाला सांगितले. पोलिसांनी सुरुवातीला पोलिसी भाषेत उत्तर दिले. पण, डॉक्टरची भूमिका आणि अपघात कसा झाला याची माहिती दिल्यानंतर पोलिसांकडून अपघाताबाबत विचारपूस झाली. याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली नाही. पण, पोलिस वाहनांचे अपघात वाढत आहेत. तेही वाहतूक सुरक्षा सप्ताहात हे विशेष.