आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेंच्या गृहमंत्री काळातच मुलींवर अधिक अत्याचार- माकप नेत्या वृंदा कारत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- देशाचे गृहमंत्रिपद असताना सुशीलकुमार शिंदे यांना महिला, मुलींचे रक्षण करता आले नाही. त्यांच्याच कारकीर्दीत महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. आज स्वत:च्या मुलीला राजकीय भवितव्य देण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. अशा स्वार्थी नेत्याला धडा शिकवा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या, माजी खासदार वृंदा कारत यांनी येथे केले.

शहर मध्य विधानसभा निवडणुकीतील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या प्रचारासाठी त्यांची माेदी येथे जाहीर सभा झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. शिंदे यांनी दलितांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या, “दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी दलितांच्या विशेष योजनांचे ७०० कोटी रुपये वापरले. त्या वेळी शिंदे यांनी ‘ब्र’ शब्द उच्चारला नाही. आम्ही त्याचा जाब विचारला. हा पैसा दलितांच्या उद्धाराचा आहे. त्यांना घरे देण्याचा आहे. तो असा व्यर्थ कसा वापरला? त्यावर केंद्राकडे उत्तर नव्हते.”
या वेळी श्री. आडम यांच्यासह कामिनी आडम, भाकपचे ज्येष्ठ नेते रा. गो. म्हेत्रस, आयटकचे चन्नप्पा सावळगी, मोची समाजचे नेते बाबूराव संगेपाग, नगरसेवक माशप्पा विटे, माकपचे नेते उदयन शर्मा आदी उपस्थित होते.

गरिबांची घरे शिंदे परिवाराने अडवली :
सकाळीश्रमिक पत्रकार संघात श्रीमती कारत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माकपने गरिबांना घरे देण्याचा एक आदर्श प्रकल्प सोलापुरात राबवला. केंद्राच्या श्रम मंत्रालयाने तो पथदर्शी प्रकल्प म्हणून स्वीकारला. १० हजार घरकुले विडी कामगारांच्या ताब्यात दिल्यानंतर आणखी २० हजार घरे बांधण्याचा प्रस्ताव पक्षाने राज्याकडे दिला. परंतु शिंदे आणि त्यांच्या कन्येने त्यात आडकाठी आणली. केवळ राजकीय भवितव्यासाठी हा अडसर आहे, असे त्या म्हणाल्या.
कामाची दिशा स्पष्ट करा
60 वर्षे सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसला आम्ही उत्तर देणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणतात. ठीकय. पण सत्ता दिल्यानंतर कामाची दिशा तरी मोदींनी स्पष्ट करावी, असेही कारत म्हणाल्या.
वृंदा कारत यांनी विचारले-
सोलापूरला पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. याबद्दल शिंदे परिवाराने कधी आवाज उठवला काय?
गरिबांना घरे देण्याबाबत शिंदे यांच्या आमदार कन्या विधिमंडळ सभागृहात कधी बोलल्या का?
वडील गृहमंत्री असताना, महिला अत्याचाराबाबत कन्येने कधी वडिलांना विचारणा केली काय?
आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडून आल्यानंतर शिंदे यांनी दलितांचे कल्याण केले का?