आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Embarasment Over The Ashoka Pillar In Corporation Meeting

महापालिका सभेत अशोक स्तंभावरून राजकीय गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अशोक स्तंभ व भारतीय घटनेची प्रस्तावना उभारणीसाठी लागणार्‍या खर्चाच्या तरतुदीवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी गोंधळ झाला. सुरेश पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वाद थंडावला आणि तरतुदीच्या विषयाला एकमताने मंजुरी देण्यात आली. या कामासाठी 17,98,500 रुपये खर्च येणार आहे. या खर्चाच्या तरतुदीचा विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत आणण्यात आला होता.

यावर विरोधी पक्षाने उपसूचना मांडण्यास सुरुवात करताच बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी एकमताने विषय मंजूर करण्याची मागणी केली. यावर सुरेश पाटील यांनी काही मुद्दे उपस्थित केले. मात्र त्यांचे ऐकून न घेता हा विषय एकमताने मंजूर करावा, अशी मागणी लावून धरण्यात आली. यानंतर राजकारण करू नका, म्हणत सुरेश पाटील यांनी त्या विषयाची फाईल फेकली. फाईल फेकताच देवेंद्र भंडारे, मधुकर आठवले, रवी गायकवाड, आनंद चंदनशिवे आदींनी आक्षेप घेतला. माफी मागितल्याशिवाय सभेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा आठवले आणि भंडारे यांनी दिला.

‘अशोक स्तंभ उभारताना अडचणी येऊ नयेत, राजकारण येऊ नये म्हणून बोलतो, माफी मागायचा संबंध येत नाही’ असे सुरेश पाटील यांनी सांगितले. मात्र, गोंधळ वाढतच गेला. विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा डाव आहे, असे मत निंबर्गी यांनी व्यक्त केले. नंतर अशोक निंबर्गी यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि जगदीश पाटील यांनी माफी मागितली.
यानंतर सुरेश पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि विषय थंडावला. वातावरण शांत होताच हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला.

काय होते भाजपच्या सुरेश पाटील यांचे म्हणणे?
हे बांधकाम किल्ल्यापासून 200 मीटर अंतराच्या आत असल्याने बांधकाम करता येत नाही, अशी टिपण्णी नगरअभियंता विभागाची आहे. तसेच हा आयलॅन्ड 2009 मध्ये महेंद्र इलेक्ट्रॉनिक्स यांना सुशोभीकरण करण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा उल्लेख सध्याच्या विषयात नाही. प्रशासन आपली दिशाभूल करीत आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर या अनेक अडचणी येऊ नये किंवा बांधकामास अडचण येऊ नये. त्यासाठी प्रशासनाने हे मुद्दे स्पष्ट करावे, विषयाला आमचा विरोध नाही, असे मत सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.