आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादाला उकळी: ऐन रमजान सणात मुख्यालयातील मशिदीचे करण्यात येतेय राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ऐन रमजानच्या सणात पोलिस मुख्यालयातील मशीद खुली करण्यावरून राजकारण तापत आहे. मंगळवारी मुस्लिम उत्कर्ष समिती आणि अन्य काही संघटनांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर तोफ डागत काळ्या फिती लावून ईद साजरी करण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानंतर बुधवारी दुपारी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत या वादात उडी घेतली.

दीड वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांनी पोलिस मुख्यालयातील मशीद फक्त पोलिसांसाठी असल्याचे सांगून बाहेरील मंडळींनी आत येणे बंद केले. तेव्हा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी संघर्षाची भूमिका घेतली होती. आमदार प्रणिती शिंदे यांना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर उच्चपदस्थ पोलिस अधिकार्‍यांनी सोलापुरात येऊन पाहणी केली होती. तत्कालीन पालकमंत्र्यांच्या बैठकांमध्ये विषय छेडला गेला. पण कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. आता रमजानच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आणून विषय तापवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे ताज्या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

पोलिस मुख्यालयाच्या परिसरात असलेली मशीद सर्वांसाठी खुली करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते व माजी महापौर यू. एन. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत केली. यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुधवारी दुपारी काँग्रेस भवनात अचानकपणे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश यलगुवार, शहराध्यक्ष धर्मा भोसले, महापौर अलका राठोड, सभागृह नेते महेश कोठे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. रमजान पवित्र सण असल्याने मुस्लिम समाज तसे करणार नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

अल्पसंख्याक सेलचे तौफिक शेख यांनी ही मशीद खुली केली नाही तर पदाचा राजीनामा देणार असे सांगितले. मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन काही संघटनांनी रमजान सणात काळ्या फिती लावून आंदोलन करू असा इशारा दिला होता. मुस्लिम उत्कर्ष समितीचे समीउल्लाह शेख, अँड. महिबूब कोथिंबरे, ओबीसी संघटनेचे इसहाक खडके, ‘छावा’चे बाबासाहेब पाटील, शिवराज्य पार्टीचे पिरजादे, भारत मुक्ती मोर्चाचे सैफन शेख, संभाजी ब्रिगेडचे सावंत होते.

बेरिया यांनी सांगितले की, 1917 पासून तेथे मशीद आहे. त्यानंतर 1923 ला पोलिस मुख्यालय झाले. मुख्यालयाच्या परिसरात मशीद असल्याने तेथे भिंत बांधून पोलिस मुख्यालयाची अडचण दूर करता येऊ शकते. या प्रकरणी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली होती, त्यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना भेटा तेथे काम झाले नाही तर आपण शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे.