आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नामुष्की: काँग्रेसच्या बेरियांकडून सत्ताधार्‍यांना घरचा आहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका सभागृहात 90 दिवसांत विविध विषय मंजूर करून घेण्यास आम्ही सत्ताधारी कमी पडलो. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाराचा वापर करत हे विषय आपल्या अखत्यारीत घेतले आहेत. या नामुष्कीला माझ्यासह आम्ही सत्ताधारी जबाबदार आहोत. त्याविषयी दु:ख वाटते, अशी भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर अँड. यू. एन. बेरिया यांनी गुरुवारी व्यक्त केली.

सत्ताधारी वारंवार दुखवट्याचे कारण पुढे करत सभा तहकूब करत राहिले. त्यामुळे विषय प्रलंबित राहिले. विषय पटलावर येऊन 90 दिवस लोटले तरी त्यावर निर्णय न झालेले तब्बल 178 विषय आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आपल्याकडे घेतले. पुढील प्रक्रिया करून हे विषय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहेत.

अँड. बेरिया यांनी पत्रकार परिषद घेत आयुक्त गुडेवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. ते निर्भयपणे काम करत असल्याने त्यांना सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, असेही मत व्यक्त केले.

अँड. बेरिया म्हणाले, की शहरात प्रचंड वाढलेले अतिक्रमण काढत आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणावरील बेकायदा बांधकामे शोधून ती तोडण्याचे धाडस गुडेवार दाखवत आहेत. यापूर्वीच्या आयुक्तांनी असे काही कार्य केलेले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गुडेवारांचे काम मोठे धाडसाचे म्हटले पाहिजे. अनधिकृत बांधकामांनी शहराची कोंडी केली होती. रस्ते लहान आणि शहर विद्रूप केले होते.

ते पुढे म्हणाले, की महापालिकेची तिजोरी भरण्यासाठी कर वसुलीचे त्यांनी चांगले प्रयत्न केले. स्थानिक संस्था कराची (एलबीटी) चांगली वसुली करावी. जनतेचे सुमारे 200 कोटी स्वत:कडे ठेवून घेणार्‍या व्यापार्‍यांवर तत्काळ कारवाई करावी.

अधिकार्‍यांवर दबाव नको
बांधकाम परवाना देणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करावी, त्यांनी नगर अभियंत्याकडे टिप्पणी कशी ठेवली, संबंधित कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांची चौकशी करावी. आयुक्त काम करत असताना त्यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव टाकू नये. त्यामुळे त्यांचे मनोबल खचेल, असेही बेरिया यांनी सांगितले.