आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Budget Declare With Same Tax, Divya Marathi

बार्शीत करवाढ नसलेल्या शिलकी बजेटला मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी नगरपालिकेच्या विशेष सभेत कोणतीही करवाढ-दरवाढ नसलेला 2013-14 चा सुधारित व सन 2014-15 च्या शिलकी अर्थसंकल्पास आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. यात करदात्यांसाठी अपघाती विमा, 24 तास पाणीपुरवठा, सामूहिक नळ योजना, व्यापारी गाळ्यांची व क्रीडा संकुलाची उभारणी, पुतळा पार्कच्या सुशोभीकरणासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, विरोधी काँग्रेसने हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका करत सभात्याग केला.
पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष कादर तांबोळी हे होते. प्रशासनाधिकारी शरद कुलकर्णी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यात जमा बाजू 229 कोटी तर चार लाख 40 हजार दर्शवण्यात आली आहे. जमा बाजूत भुयारी गटारीसाठी मिळणार्‍या 71 कोटी व महाराष्ट्र सुजल निर्मल पाणीपुरवठा योजनेच्या 49 कोटींचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नागेश अक्कलकोटे यांनी विविध विकासकामांसाठी पैसा कमी पडत असल्याने नगरपालिकेचे उत्पन्न वाढवणे आवश्यक आहे. तरीही करवाढ, दरवाढ न करण्याचा निर्णय घेऊन नगरपालिकेने शहरवासीयांवर कोणत्याही प्रकारचा बोजा टाकला नसल्याचे म्हटले. तसेच यूआयडीएसएसएमटी या केंद्राच्या योजनेंतर्गत 89 कोटींमधून भुयारी गटार योजना, शहर पाणीपुरवठा योजना बळकटीकरणासाठी सुजल निर्मल योजनेंतर्गत निधीची तरतूद केल्याचेही सांगितले.
विरोधी गटाचे नगरसेवक अशोक बोकेफोडे यांनी या अर्थसंकल्पातून सकृतदर्शनी विकासाचा आभास निर्माण होत असला तरी हे फसवे असल्याची टीका केली. जमा व खर्चाचे आकडे फुगवून अर्थसंकल्पात कोटीच्या कोटीची उड्डाणे घेणार्‍या सत्ताधार्‍यांनी कोट्यवधी रुपये खर्ची दाखवूनही शहरात विकासकामे का दिसत नाहीत, असा सवाल केला. यातील अनेक तरतुदी कायद्याचे उल्लंघन करणार्‍या असल्याचेही त्यांनी म्हटले.
आवाजी मतदान, अर्थसंकल्प फसवा असल्याचा आरोप करत विरोधी काँग्रेसचा सभात्याग
24 तास पाणीपुरवठा, टंचाईसाठी आराखडा
हे झाले निर्णय
प्रत्येक नळाला तोटी बसवणे, नगरपालिका कर्मचार्‍यांना शौचालय बंधनकारक, डिजिटल फलकांसाठी जाहिरात फलक उपविधी, करवसुलीसाठी पाठपुरावा करणे, विकास योजनेत सुधारणा, कत्तलखान्यासाठी पाठपुरावा करणे, अनधिकृत नळजोडणीधारकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र, राज्याच्या योजना
राज्य सरोवर संवर्धन प्रकल्पांतर्गत सुभाषनगरातील गणेश तलावाचा विकास, ईको फ्रेंडली डेव्हलपमेंट योजनेंतर्गत 10.5 कोटी रुपयांची विकासकामे करणे, रमाई घरकुल योजना, केंद्राचा शहर स्वच्छता आराखडा, राजीव आवास योजना, दुर्बल घटकासाठी अधिक खर्च करण्याचा या अर्थसंकल्पात समावेश आहे.
नव्याने सुरू केलेल्या बालवाडीच्या कर्मचार्‍यांना देणार मानधन
करदात्यांसाठी अपघाती विमा, नियोजित जागेवर क्रीडा संकुलाची उभारणी, उत्पन्नवाढीसाठी व्यापारी गाळ्यांचे बांधकाम, नगरपालिका शाळांमध्ये स्वयंस्फूर्तीने सुरू केलेल्या बालवाडीतील कर्मचार्‍यांना मानधन, गरीब व गरजू नागरिकांसाठी (कै.) शोभाताई सोपल सामुदायिक नळ योजना, पुतळा पार्कसाठी 55 लाख, पाणीटंचाई निवारणासाठी 150 लाखांचा आराखडा, शहर स्वच्छता आराखड्यासाठी नवीन लेखाशीर्ष यासाठी तरतूद करण्यात आली.
तरतूद । करदात्यांसाठी अपघाती विमा, क्रीडा संकुल, व्यापारी गाळ्यांची उभारणी